प्रतिष्ठा न्यूज

श्री. शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या विधानाचा विपर्यास करून समाजात अशांतता निर्माण केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल ! – सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर पीठाचे श्री. शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पुणे येथे केलेल्या मार्गदर्शनातील एका निवडक विधानाचा सोयीस्कर अर्थ काढून शहरातील काही स्वयंघोषित पुरोगामी अकारण वाद निर्माण करत आहेत. वास्तविक जे लोक धर्मच मानत नाहीत त्यांना असा आक्षेप घेण्याचा अधिकारच नाही. श्री. शंकराचार्य स्वामी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कुठेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. त्यामुळे त्यांनी क्षमा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. पुरोगामी लोकांनी हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर पीठावर मोर्चा, निदर्शने यांची भाषा करू नये. विनाकारण समाजात वादविवाद निर्माण करून अशांतता निर्माण केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जे लोक कोल्हापूरचे सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचीही मागणी या वेळी करण्यात आली.

या प्रसंगी अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने,श्री. जयराज भाईराणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शोभाताई शेलार-पाटील, उपाध्यक्ष श्रीमती शिलाताई माने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ह.भ.प. यादव महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

श्री. शंकराचार्य स्वामी यांनी पुण्यात धार्मिक प्रवचनात श्रीमद्भगवतगीतेचा एक सिद्धांत दिला होता. यात त्यांनी हिंदू समाज संघटित व्हावा आणि हिंदू धर्मातील लोक मांदियाळीसारखे एकसंघ रहावे असे विधान केले होते. जर लोणच्यामध्ये एखादा पदार्थ बाहेर गेला, तर ते लोणचे होत नाही, तसेच त्याची चव रहात नाही. त्या पद्धतीचा हा सिद्धांत आहे. श्री. शंकराचार्य स्वामी यांनी त्यांच्या व्याख्यानात कोणतीही अर्वाच्य भाषा अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे विधान केलेले नाही. हिंदु धर्माचा पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवत्गीतेमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे. ही व्यवस्था मनुष्यनिर्मित नसून भगवदनिर्मित आहे असाही उल्लेख आहे. सनातन हिंदु धर्म हा पूर्वापारपासूनच वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. वर्णव्यवस्थेच्या परंपरेमुळे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश भारतात सनातन हिंदु धर्म नष्ट करू शकले नाहीत. वर्णव्यवस्थेचे रूपांतर पुढे जातीव्यवस्थेत झाले. हिंदु धर्मात आता ज्याप्रकारे जातीव्यवस्था आहे त्याप्रकारे अन्य धर्मातही जातीव्यवस्था आहे. त्यात नवीन असे काही नाही. असे असूनही आचार्यांनी त्यांच्या व्याख्यानात कोणत्याही अमुक एक जातीचा किंवा जातीयवादाचा उल्लेख केला नाही. समाज सुरळीत चालण्यासाठी सर्वांनी एकसंघ रहावे हाच संदेश दिला; पण स्वत:ला पुरोगामी समजणारे कर्मविचारी लोक याचा वेगळा अर्थ काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोल्हापुरात शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्यावर पुरोगामी कोणत्या बिळात लपून बसले होते ?

जेव्हा जेव्हा कोल्हापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला, तसेच त्यांचा आणि प्रभु श्रीराम यांचा जयघोष करणार्‍या शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाली, तसेच अनेक धार्मिक पेचाचे प्रसंग उद्भवले, तेव्हा हे पुरोगामी कुठे होते ? त्या प्रसंगी एकाही पुरोगाम्यांने याचा साधा निषेधही का केला नाही ? त्या वेळी ते कोणत्या बिळात लपून बसले होते ? त्या वेळेस त्यांची शाहू महाराज यांच्या नगरीची अस्मिता कुठे गेली होती ? फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी श्री. शंकराचार्य स्वामीजींच्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास केला गेलेला आहे. यामुळे कोल्हापूरात जर सामाजिक तणाव निर्माण झाला आणि अशांती निर्माण झाली, तर त्याला पुरोगामी पूर्णपणे जबाबदार असतील याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.