प्रतिष्ठा न्यूज

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या संजयकाकांना धडा शिकवा : अजितराव घोरपडे; मिरज पूर्व भागात प्रचार दौऱ्यावेळी घणाघात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यातील सहकारी संस्था संपविण्याचे काम संजयकाका पाटील यांनी केले. गणपती जिल्हा संघासह दोन साखर कारखानेही संपविले. जिल्हा बँकेकडेही त्यांनी मोर्चा वळविला होता. गेल्या दहा वर्षात भाजप व खासदारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग करणाऱ्या संजयकाकांना धडा शिकवावा, अशा शब्दात माजी अजितराव घोरपडे यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या हल्ला चढविला.
मिरज पूर्व भागातील एरंडोली, खंडेराजुरी, मल्लेवाडी, शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, संतोषवाडी, कदमवाडी, जानराववाडी, सलगरे, चाबुस्कारवाडी, खटाव, लिंगनूर येथे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या प्रचारार्थ बैठका, सभा झाल्या. यावेळी अजितराव घोरपडे बोलत होते. यावेळी उमेदवार विशालदादा पाटील उपस्थित होते.
घोरपडे म्हणाले की, कर्मकरंट्या खासदारामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. त्यात भाजप शासनाची भर पडली आहे. सहकारी संस्था संपविण्याचे काम खासदार संजयकाका पाटील यांनी केले. गणपती जिल्हा संघासह दोन साखर कारखानेही संपविले. जिल्हा बँकेकडे मोर्चा वळविला होता. पण तिथे मी व विशाल पाटील यांना असल्याने डाव यशस्वी झाला नाही. भाजपमधील अनेकजणांचाही संजयकाकांच्या उमेदवारीला विरोध होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देता कामा नये. सातबाराच्या सुरळीतून खासदार बाहेरच पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यातच त्यांना अधिक रस दाखविला, अशी टीका केली.
आदर्श खासदार म्हणून विशाल पाटील काम करतील. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडून जिल्ह्यात विशाल नवीन पर्व सुरू होईल. शेतीच्या प्रक्रिया संस्था उभा करण्यासाठी विशालदादांना साथ द्या. बंडखोरीची प्रथा मिरज पूर्व भागाला नवीन नाही. बंडखोरीला साथ देणे रक्तातच आहे. मिरज पूर्व भाग विशालदादांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
विशालदादा पाटील म्हणाले की, जनतेच्या आशिर्वादाला तडा जावू देणार नाही. सांगलीच्या जनतेला अभिमान वाटेल असाच खासदार होऊन दाखवूू. दिल्लीत बोलणारा खासदार हवा. लोकसभेत आवाज उठविला पाहिजे. जो व्यक्ती एक शब्द बोलू शकला नाही, त्यांनी एक रुपयांही दिल्लीतून आणला नाही. त्यामुळेच जिल्हा विकासात मागे पडला आहे. जनतेचे प्रेम पाहून भारावून गेलो आहे. या प्रेमातून उतराई होण्यासाठी आयुष्य खर्ची टाकू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.