प्रतिष्ठा न्यूज

भोंदुगीरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा ; पैशाचा पाऊस प्रकरणाबद्दल सातारा अंनिसची मागणी; सातारा पोलीसांच्या कार्यवाहीचे स्वागत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, मौल्यवान आर.पी. कॉइन तयार करून ५० कोटी मिळवून देतो, विज पडलेल्या दगडाचे भांडे मिळवून देतो अशी आमिषे दाखवून 36 लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन अटक केली.

सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेवून केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. या प्रकरणांमध्ये अनेक जणांची फसवणूक झाली आहे. हे मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे असा संशय आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भुलथापा देऊन काही मांत्रीक लोकांना लाखोचा गंडा घालत आहेत. फसव्या विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हात चलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. पैश्याचा पाऊस ही अंधश्रध्दा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा शाखेचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे. अशी फसवणूक झालेले आणखी कोणी तक्रारदार असतील तर त्यांनी पुढे येवून पोलिसांशी अथवा जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

सांगली जिल्हा प्रमाणे म्हैसाळ येथे अशाच प्रकारची फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मंत्रिकाने विष देऊन संपवले होते. या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्यानं म्हैसाळ सारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादुटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी या निमित्ताने अंनिस करत आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांना अंनिसचे शिष्ठमंडळ भेटून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी जिल्हाव्यापी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत अशी मागणी करणार आहोत.

सातारा जिल्ह्यातील वाई मध्ये काही दिवसांच्या गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता, पाटणमध्ये देखील दोन वर्षांच्या पूर्वी नरबळी ची घटना झाली होती. पाटण मधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणांत भोंदूगिरी चालते. त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे आवश्यक आहे असे मत सातारा अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, वंदना माने यांनी व्यक्त केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.