प्रतिष्ठा न्यूज

विवेकवादी चळवळींच्या मदतीसाठी ‘मधुरजग ‘ची स्थापना – जगदीश काबरे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्राला पुरोगामी म्हटले जाते, याचे कारण महाराष्ट्राला विवेकवादी चळवळींची आणि अशी चळवळ राबवणाऱ्यांची परंपरा आहे. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या अशा सर्व लहानमोठ्या चळवळींना प्रोत्साहन पुरस्कार देण्यासाठी आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मधुरजग फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा जगदीश काबरे यांनी नुकतीच एका छोटेखानी कार्यक्रमात केली. हे फाउंडेशन जगदीश काबरे यांनी त्यांच्या पत्नी माधुरी काबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या दोघांच्या कल्पनेतून आणि वैयक्तिक मिळकतीतून निर्माण केले आहे.

या फाउंडेशनच्या वेबसाईटचे उद्घाटन मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या क्रियाशील कार्यकर्त्या प्रा. बेनझीर तांबोळी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात सिनेदिग्दर्शक क्रांती कानडे लाभले होते.

वेबसाईटचे उद्घाटन करताना बेनझीर तांबोळी म्हणाल्या की, ‘माधुरी काबरे यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व पाहून मी भारावून गेलेले आहे. त्यांनी जे काम केले आहे ते आपल्यासाठी दिशादर्शक आहे.’

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रांती कानडे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘माधुरी काबरे या कॅन्सरग्रस्त असतानाही आणि मृत्यूच्या छायेत वावरत असतानाही या फाउंडेशनची कल्पना त्यांना सुचली ही खरोखरच खूप दुर्मिळ आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. माणसे किती विविध पातळ्यावर समाजाच्या भल्यासाठी विचार आणि काम करत असतात हे यातून दिसते.’

या फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश काबरे यांनी ‘विवेकवादी चळवळी समाजात बदल घडवून आणत असतात. त्यासाठी अशा चळवळींना सतत कार्यरत राहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक आणि मानसिक पाठिंबा मिळणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन ‘मधुरजग फाउंडेशन’ची स्थापना केली आहे’, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मृत पत्नी माधुरी काबरे यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा ठाव घेणाऱ्या आठवणी अत्यंत नेमक्या शब्दात जागवल्या आणि त्यांच्या विषयीच्या आपल्या तरल भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर ‘मधुरजग फाउंडेशन’च्या निर्मितीची कहाणीही कथन केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘मधुरजग फाउंडेशन’चे सचिव कुमार नागे यांनी केले. यावेळी माधुरी काबरे यांचे भाचे अभिजीत द्रविड आणि गुरुदत्त द्रविड यांचीही समायोजित भाषणे झाली. धनंजय आरवाडे यांनी वेबसाईट संबंधीची तपशीलवार माहिती दिली.

या कार्यक्रमास डॉ. निखिल जोशी, शमशुद्दीन तांबोळी, राहुल खरे, राहुल थोरात, मयूर कुलकर्णी, उत्तम जोगदंड, अक्षय नाईक, रुपेश घाग, संजय पुजारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.