प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजयकाका पाटील यांची कट्टर विरोधक विशालदादा पाटील यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर : विशालदादांचा नेमका पक्ष कोणता; राजकीय चर्चेला उधाण

प्रतिष्ठा न्यूज / तानाजीराजे जाधव
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांना देशाची दिशा ओळखून सर्वांनी भाजपात प्रवेश करावा, अशी खुली ऑफर सांगली येथे मंचकावरून दिली. संजयकाकांचे विरोधक समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी आटपाडी येथे दिलजमाई झाल्यानंतर आता विशाल पाटील यांना थेट भाजपमध्ये आणण्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
आज दि. १६ ऑक्टोंबर रोजी सांगली सिव्हील चौकाचे नामकरण डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम असे करून चौकाचे लोकार्पण आज सांगली महापालिकेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक राजकीय किस्से घडले. यावेळी संजकाकाका पाटील यांनी कॉंग्रेस नेत्यांना भाजप प्रवेशाची ही ऑफर दिली.
कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते हा नामकरण व लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महापौर दिग्वीजय पाटील यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक, कॉंग्रेसचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम यांच्या अनेक आठवणी सर्वच वक्त्यांनी मंचकावरून सांगितल्या. परंतु त्याचवेळी सर्वांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांचेही भरभरून कौतुक केले. सांगली जिल्हा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सुरेश खाडेंचे जरा जास्तच कौतुक केले. त्यानंतर विशालदादा पाटील बोलायला उभे राहीले आणि त्यांनी पृथ्वीराज पाटील नेमके कॉंग्रसमध्ये आहेत की भाजपमध्ये असा सवाल उपस्थित केला. त्यांनी अनेक राजकीय कोट्या करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, विश्वजीत कदम यांनी सुरेश खाडेंवर स्तुती सुमने उधळली.
खासदार संजयकाका पाटील बोलायला उभे राहीले आणि त्यांनी सर्वांवर कुरघोडी करत डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच सुरेश खाडे यांच्या पालकमंत्री पदाबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. बोलता बोलता त्यांनी देशभर सध्या भरतीय जनपा पार्टीचेच वातावरण आहे. देशाची दिशा ही भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे विशाल पाटील यांनी भाजपमध्ये यावे. तसेच माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करावा. अशी खुली ऑफर दिली. संजयकाकांच्या या वक्तव्यामुळे सभामंडपात एकच हशा पिकला आणि राजकीय चर्चेला उधाण आले. संजयकाकांनी आपण सर्वजण एकत्र येवून जिल्ह्याच्या विकासाला गती देवूया त्यासाठी सर्वांनी भाजपवासी व्हावे अशी खुली ऑफर दिली. विश्वजीत कदम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेचा धुरळा अजून खाली बसत नाही तोवरच संजयकाकांनी नवी ऑफर देवून मासे जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर मी लढणारा माणूस आहे, त्यामुळे मला कसलीही अडचण येणार नाही. असे सांगायलाही ते विसरले नाहीत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत संजयकाका पाटील यांच्या विरोधात विशालदादा पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर तर सध्याचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवडणूक लढविली होती. तेव्हा पडळकर व विशालदादा यांनी संजयकाकांवर टोकाची टिका केली होती. नुकतीच आटपाडी येथे पडळकर व संजयकाका यांची दिलजमाई झाली आहे. दिल दोस्ती दुनियादारीच्या गोष्टी झाल्या आहेत. एका विरोधकाला आपल्या बाजूने वळविल्यानंतर त्यांनी कट्टर विरोधक मानल्या जाणार्‍या विशालदादांनाच थेट भाजपमध्ये आणून विरोधक पूर्णपणे संपविण्याचा डाव टाकला आहे. अशी चर्चा रंगली आहे.

विशालदादा पाटील यांचा सध्याचा नेमका पक्ष कोणता : ना. डॉ. सुरेश खाडे यांचा सवाल
संजयकाकांच्या भाषणानंतर मंत्री डॉ. सुरेश खाडे बोलायला उभे राहीले. डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम चौकाचे सुशोभिकरण व लोकार्पण झाल्याचे त्यांनी जाहीर केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगीतल्या. संजयकाका पाटील यांनी विशालदादा पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिल्ल्याच्या मुद्द्याला हात घातला. विशाल पाटील यांनी लोकसभेची निवडणूक ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढविली होती. त्यामुळे ते सध्या नेमके कोणत्या पक्षात आहेत? असा थेट सवाल सुरेश खाडे यांनी विचारला. तेव्हा विश्वजीत कदम यांनी ते सध्या कॉंग्रेसमध्येच आहेत. असा खुलासा केला.
एकंदरीत हा चौक लोकार्पणाचा सोहळा राजकीय चर्चेने रंगला. कॉंग्रेस नेत्यांची भूमिका नेमकी काय राहणार? कार्यक्रमातील एक गमतीचा, मनोरंजनाचा भाग म्हणून ते सोडून देणार की खरच याचा गांभीर्याने विचार करणार हे लवकरच समजेल. आमदार गोपीचंद पडळकर यांना आपल्या बाजूने वळविल्यानंतर विशालदादा पाटील यांना खरच भाजमध्ये आणण्यासाठी खासदार संजयकाका पटील आपली ताकद पणाला लावणार काय? यावर मात्र आता विश्वजीत कदम याच्या भाजप प्रवेशा इतकीच चर्चा रंगणार आहे. विशाल पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात… याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.