प्रतिष्ठा न्यूज

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी- मान्यडचा वाघ माजी खासदार-आमदार डॉ.भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांचे निधन : उद्या अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी डॉ.भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्द गाजवली. त्यामुळेच शेतकरी कामगार पक्षा मध्ये असतानाही त्यांचा कामाचा आणि राजकीय उंचीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेल्या डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. जनतेवरचं त्यांचे प्रेम आणि जनतेचा विश्वास याच बळावर डॉ. केशवराव धोंडगे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले.1975 साली आणीबाणीचा विरोध करताना 14 महिने कारावास भोगला. विशेष म्हणजे आणिबाणीनंतर 1977 मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ख्याती होती. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वतःला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने विधिमंडळ आणि संसदेत मांडले.
उद्या दि. 2 जानेवारी 2023 रोज सोमवारी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी पानभोसी रोड, कंधार.येथील शिवाजी हायस्कुल येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघणार असून दुपारी 4:15 वाजता “क्रांतिभुवन” बहाद्दरपुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
●खा. प्रतापराव पाटील चिखलीकर●
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारून मोठी शैक्षणिक चळवळ निर्माण केली होती.आयुष्यभर एकाच विचारसरणीशी बांधिल राहिलेल्या भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेड आणि मराठवाड्यातील कामगार चळवळीचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

●मा.मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची●
ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यसेनानी डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना चव्हाण म्हणाले की, भाईंचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी समर्पित होते.
गरजू, वंचित, शोषितांसाठी त्यांनी विधीमंडळापासून रस्त्यापर्यंत आक्रमक संघर्ष केला. ते एक अभ्यासू व निर्भीड लोकप्रतिनिधी होते.फर्ड्या वक्तृत्वाने त्यांनी विधानसभा व लोकसभा गाजवली. त्यांची भाषणे टोकदार, घणाघाती व जबरदस्त प्रहार करणारी असायची. वेळप्रसंगी देशाच्या पंतप्रधानां नाही खडे बोल सुनावणारे परखड व कणखर भाई खऱ्या अर्थाने ‘मन्याड खोऱ्याचा “वाघ” होते.असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.