प्रतिष्ठा न्यूज

कला ही मानव मुक्तीच्या विचाराने भारलेली असेल तर ती श्रेष्ठ कला ठरते! – प्रा. गौतमीपुत्र कांबळे ; – सांगलीत नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनाची सांगता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आपल्या देशातील केवळ शब्द नव्हे तर रंग, रेषा, सूर आणि नृत्यमुद्राही इथल्या प्रतिगामी संस्कृतीने भ्रष्ट केली आहे, त्यांना पुन्हा मुक्त करणे ही विवेकवाद्यांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले. ते नरेंद्र दाभोलकर चित्र शिल्प प्रदर्शनाच्या सांगता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

मराठा समाज सांगली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि फ्रेंड्स ऑफ दाभोलकर यांनी आयोजित केलेले ‘विवेकाची कसोटी’ हे प्रदर्शन गेली तीन दिवस सांगलीत सुरू होते.याची सांगता आज झाली.

प्रा. कांबळे पुढे म्हणाले की, ‘कलावंत जन्माला यावा लागतो’, कला ही निर्हेतूक असावी, कलेमध्ये हेतू विचार आणला की त्याचे कला मूल्य कमी होते’ अशा कुविचारांची मांडणी सध्या कलाक्षेत्रात केली जात आहे, हे खुप धोकादायक आहे. खरेतर कला ही मानवमुक्तीच्या विचाराने भारलेली असेल तर ती श्रेष्ठ कला ठरते. कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून क्रांतीच्या बाजूने आणि प्रतिक्रांतीच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केली.

देशामध्ये सध्या इतके दुषित वातावरण निर्माण केले आहे की, उदया ‘चित्रकारांनी अमुक रंग वापरला म्हणून, किंवा अमुक रंग का वापरला नाही? म्हणून प्रतिगामी त्यांचेवर हल्ले करतील, तेव्हा चित्रकारांनी त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की, ‘रंगावर पहिला हक्क आमचा आहे. रंगाच्या राजकारणा विरोधात चित्रकारांनी आणि पुरोगामी कार्यकर्तेनी कृतीशील भूमिका घ्यायची वेळ आली आहे असे मत प्रा. कांबळे यांनी व्यक्त केली.

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील म्हणाले की, कला आणि विज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकच आहेत. कलेचा पाया विज्ञान आहे. बुध्दिप्रामाण्यावादी लोक अरसिक असतात असा अपप्रचार केला जातो, पण जगातील महान कलाकार हे बुद्धीप्रामाण्यवादी होते, संकुचित विचाराने कलेचा विकास होत नाही. कला ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रुप घेऊन पुढे येवू शकते हे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट च्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून सिद्ध केले आहे. मानवी मूल्यांसाठी चित्र काढणारे चित्रकार हे आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहेत.

डॉ. अनिल मडके यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कलेच्या माध्यमातून विवेकवाद पुढे नेण्यासाठी या कला प्रदर्शनाची मोठी मदत झाली आहे असे मत व्यक्त केले.

फ्रेंड्स ऑफ दाभोलकर ग्रुपचे समन्वय पत्रकार सुहास जोशी यांचा सत्कार प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल थोरात यांनी केले तर आभार डॉ. सविता अक्कोळे यानी मांडले. या सांगता कार्यक्रमाची सुरुवात आज महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठा समाजचे वॉचमन बाळकृष्ण नलवडे यांचे हस्ते म. गांधीच्या प्रतिमेला अभिवादन करुन झाली.

या कार्यक्रमास प्रा. अमित ठाकर, डॉ. संजय निटवे, विज्ञान लेखक जगदीश काबरे, मराठा समाज चे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धोडींराम पाटील, राजीव देशपांडे, सुहास पवार, सुहास यरोडकर, संजय गलगले उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.