प्रतिष्ठा न्यूज

जागतिक महिला दिन स्री सबला की अबला ? वास्तविक जीवनमान

भारतीय संस्कृतीने स्री चा दर्जा सर्वौपरी वंदनीय मानला आहे.मातृदेव भव!हि सुरूवात आहे.नंतर आचार्य देव भव.

अर्धनारी नटेश्वर हि संकल्पना मूर्त रुपांत भारतीय संस्कृती चे सर्वमान्य प्रतिक होय. शिवाचे अर्ध्या अंगात शक्ती वसलेली आहे.पौराणिक कालखंडात वशिष्ठ -अरुंधती, अगस्ती-लोपामुद्रा, याज्ञवल्क्य -मैत्रयी- -कात्यायनी,अत्री-अनुसया,राम-सिता,नल-दमयंती,कृष्ण-रुक्मिणी या पूर्ण शक्तीशाली व आदर्श जोड्या होत्या.
संत मालिकेत संत जनाबाई,संत मुक्ताबाई, कान्होपात्रा,एक ना अनेक यादी आहे.आदर्शराज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ,
तसेच राजमाता जिजाऊ,अलिकडे एकमेव उदाहरण म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी.
आपल्या संस्कृतीत प्रसंगपरत्वे काहिंनी स्रीयांचे बाबतीत तीरस्करणीय तत्वज्ञानाची मांडणी केली असेल तो त्यांच्या वैयक्तिक विचारसरणी चा भाग .याचा अंगिकार कोणी केलेला नाही.
परंतु मला राजा भृर्तहरी यांच्या श्लोकाचा दाखला द्यावा वाटतो.ते म्हणतात हे कविलोकं उलटच बोंब ठोकतात .जे नेहमीच सुंदरींना अबला बोलतात.चंचल मनमोहक दृष्टी पडताच इंद्रासारखे देवता सर्वस्व भान हरपून बसतात.म्हणून स्त्रीला अबला का बोलतात?
‘ये नित्यमाहुरबला इतिकामिनीनाम्|’

स्त्रियांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास आपल्याला लक्षात येते की एक म्हणजे स्त्रियांविषयी असणारा समाजाचा सकारात्मक , उदारमतवादी दृष्टिकोन तर दुसऱ्या बाजूस स्त्रियांविषयी असणारा समाजाचा कमालीचा नकारात्मक आणि उदासीन दृष्टिकोन होय .
भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो असे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्री मुळेच घडले, राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तीवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुले यांची साथ मिळाली म्हणून ज्योतिबा फुले महात्मा झाले. इतकेच नव्हे तर कौशल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देव, प्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आविष्कार आहेत. स्त्रियांमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचतवृत्ती, स्मरणशक्ती हे गुण निसर्गःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे. कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांनाच दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरूषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. अगदी काम करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या महिला देखील स्वतःला सक्षम मानत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे. पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे महत्त्वाचं आहे. कारण महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे. आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.

वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सबलीकरण किंवा महिला स-शक्तिकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. “महिला सबलीकरण म्हणजे ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कोणाच्याही साहाय्याशिवाय जीवन जगू शकते.” महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे. परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत, या बदलानुसार महिला सबलीकरणावर जागतिक पातळीवर चर्चा होत आहे. महिला सबलीकरणासाठी विविध कार्यक्रम व ध्येय धोरणे राबविले जात आहेत त्यातून महिला विकासाचा तसेच महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, वैचारिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा विविध घटकांचा विचार केला जात आहे. स्रीशक्ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणूनच इसवी सन 1975 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय महिला वर्ष” म्हणून साजरे केले गेले. तसेच भारतानेही 2001 हे वर्ष “महिला सबलीकरण वर्ष” म्हणून जाहीर करून महिलांबाबत वेगवेगळ्या योजना आखल्या. त्यातूनच महिलांचे जीवनमान व दर्जा कसा उंचावता येईल व त्यांची सर्व क्षेत्रात प्रगती कशा प्रकारे साधता येईल याचा सर्वंकष विचार करण्यात आला. सरकारद्वारे मातृदिवस, महिला दिन, बालिका दिन, जननी सुरक्षा अभियान असे कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे समाजात स्त्री शक्तीचे महत्त्व व अधिकार जागृत करण्याचे काम केले जाते. पण त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. “महिला सबलीकरण म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठता सिद्ध करणे असे नव्हे, तर महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागवणे होय.” असा विचारप्रवाह समाजात प्रस्थापित झाला तर खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण होईल. दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका महिला पार पाडतात. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलपणे त्या निभावत आहेत. असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबन आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. स्त्रियांचे योगदान हे कुटुंबापासून देशसेवेपर्यंत आहे. या दृष्टीने स्त्रियांची स्थिती व समस्यांवर वैचारिक मंथन होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण हा विषय फक्त चर्चेचा न राहता त्याला कृतीची सुद्धा जोड मिळावी. भारताचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्त्रियांच्या कल्याणासाठी व स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी जे विविध प्रयत्न झाले आणि त्याची फलश्रुती म्हणून जे विविध कायदे, योजना आल्या हा महिला सबलीकरणाचाच भाग आहे. समाजात स्त्रियांची प्रतिष्ठा व सन्मान वाढावा म्हणून विविध कायदे व योजना निर्माण करण्यात आल्या.

भारत सरकारच्या महिला सबलीकरणासाठी अनेक योजना चालवल्या जातात. यापैकी अनेक योजना रोजगार, शेती आणि आरोग्य यांसारख्या गोष्टींशी संबंधित आहेत. या योजना भारतीय महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून समाजातील त्यांचा सहभाग वाढवता येईल. भारतीय महिलांच्या सबलीकरणासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय आणि भारत सरकारद्वारे विविध योजना चालवल्या जातात. त्यामध्ये स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींचे शिक्षण डोळ्यासमोर ठेवून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजना आली आहे. महिलांना 24 तास आपत्कालीन साहाय्य सेवा पुरवण्यासाठी देशभरात 181 नंबर डायल करून महिलांना तक्रार नोंदवता येण्यासाठी ‘महिला हेल्पलाइन योजना’ राबविण्यात आली आहे. महिलांची तस्करी आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी ‘उज्वला’ योजना राबविली आहे. शिवाय या योजनेअंतर्गत महिलांचे पुनर्वसन व कल्याणासाठी ही काम केले जाते. महिलांचे कौशल्य सुधारण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी महिलांसाठी ‘प्रशिक्षण आणि रोजगार कार्यक्रम’ राबविला आहे .

महिला सबलीकरण खरंतर भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप म्हणून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेले . स्त्री ही सशक्त तर आधीपासूनच आहे कारण आमची शक्ती आमचे शौर्य , बुद्धी यांची प्रचिती तर देवापासूनच होते पुराणांमध्ये म्हणूनच स्त्रीशक्तीला वंदन केले आहे . स्त्री ही अनादी काळापासूनच शक्ती स्वरूपात आहे . परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे . प्रत्येक कठीण कामात सुद्धा स्त्री स्वतः अग्रणी आहे .

एवढेच नाही तर राक्षसांचा संहार सुद्धा स्त्रीने केला आहे . म्हणून महिला सशक्तिकरण हे आधुनिक नसून पौराणिक आहे . त्याचवेळी याच भारत देशात महिला घर आणि समाज बंधनामध्ये अडकून पडले आहेत . त्यांना दुय्यम स्थान दिले जाते . त्यांच्या अधिकार व विकासापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते . तरीसुद्धा येथे स्त्री पुरुष समानतेविषयी बोलले जाते. महिलांच्या स्वतंत्र व अधिकारांविषयी तळमळ व्यक्त केली जाते असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डी सारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात . अशावेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनवून उभे राहतात . त्यावर उपाय म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता , सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाची अभियान राबविण्यास आपण सुरुवात करतो पण खरंच महिलांचे सबलीकरण होते का ? जर खरंच आपल्या देशाला शक्तिशाली देश बनवायचा असेल तर त्यासाठी समाजातील महिलांनाही सामर्थ्यवान बनवावे लागेल कारण महिला सबलीकरणाचा मुख्य फायदा समाजाशी निगडित आहे . महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे . सावित्रीबाई फुले , राणी लक्ष्मीबाई , कल्पना चावला , सिंधुताई सपकाळ , राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडीअडचणींचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले . संकट आणि आव्हानांचा सामना करताना त्या कधीच मागे पडल्या नाही .
आज ज्ञान , विज्ञान , तंत्रज्ञान , अवकाश , संशोधन , अर्थाजन अशा पायऱ्या चढत तिने अंतराळात गरुड झेप घेतली आहे . असे असले तरी आजही स्त्रीचे ‘ सती ‘ जाणे सुरू आहे . फक्त त्याचे स्वरूप , संदर्भ व परिस्थिती बदललेली आहे . खरं पाहता स्त्रियांचे योगदान हे कुटुंबापासून ते देशसेवेपर्यंत आहे म्हणून मला असे वाटते की महिला सबलीकरण हा फक्त चर्चेचा विषय न ठरता त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे .

महिला सशक्तिकरण हे आधुनिक नसून पौराणिक असले तरी बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे . ती मुलगी ,सून , माता या भूमिका व्यतिरिक्त अधिकारी , वैज्ञानिक , मालक अशा अनेक रूपाने आहे .तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत . आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तुत्वाने दिली आहे . आपल्या बुद्धीला आत्मसन्मानाला तिने नवी दिशा दिली आहे . आजच्या जगात असे कोणते क्षेत्र नाही तिथे स्त्री नाही . प्रत्येक क्षेत्रात पुरुषापेक्षा पुढे आहे . या सर्व गोष्टीचा विचार केला तर असे वाटते की आमची आम्हाला जागा मिळाली आहे पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहे. आमचा विकास तर झालाच आहे पण सर्वांगीण नाही.समाजाचा काही वर्ग खूप पुढे गेला आहे परंतु काही वर्ग खूपच मागे आहे . अजूनही त्यांचा विकास झाला नाही . अजूनही स्त्रिया अशिक्षित , अंधश्रद्धा , पतीची मारहाण , हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेले आहेत . त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाही .

आज आपल्यापैकी अनेक महिला शिक्षिका , डॉक्टर , अभिनेत्री , न्यायाधीश ते पंतप्रधान, राष्ट्रपती,देशाच्या सर्वोच्च पदावर देखील आहेत . त्याच वेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात , हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही . त्यांची बातमी ही वर्तमानपत्रात झळकत नाही . त्यांच्या अधिकारासाठी आंदोलनही होत नाही . असे का ? जर आपण विकासाच्या गोष्टी करतो तर या स्त्रियांचा विकास करणे आपली जबाबदारी नाही का? आत्मविश्लेषण केल्यास ही जबाबदारी आपली आहे याची जाणीव आपल्याला होईल .
त्यांच्या मागासण्याचं कारण आम्ही काही अंशी आहोतच या प्रश्नांना सोडविण्यासाठी आंदोलनाचे रूप द्यावंच लागेल . मला वाटतं आपल्या जीवन कार्यात एक दिवस तरी समाजासाठी दया . जर हे प्रश्न आज सोडू शकलो नाही तर हे असेच कायम राहतील . अनेक मुले अनाथ होतील . काही तर जन्मच घेणार नाहीत . अनेक स्त्रियांची अश्रू तर असेच वाहत राहतील . मग फक्त 8 मार्च ह्या दिवसाला स्त्री दिन म्हणतात पण का ? एकच दिवस स्त्री दिन का म्हणून पाळायचा ? जसा शेतकरी बैलपोळा साजरा करतो . बैलाला सजवून त्याच्याकडून काम न करून घेता त्याला सजवून त्याला पुरणपोळी खाऊ घालून त्याचे आभार मानतो आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा औताला किंवा बैलगाडीला जुंपतो . बरं ज्या बैलाचे एवढे कौतुक केले जाते त्याच बैलाला म्हातारा झाला की मग सरळ कसायाला विकायला पण तोच शेतकरी कमी करत नाही . तसंच काहीसं वाटतं हे

पुरुषत्त्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग
उघड्या शाश्रू नयनांनी बघायचंय
काळाच्या पडद्याआड ओढू नकोस आई
मला आता जगायचं मला आता जगायचं …..

ही आर्त पुकार आहे .गर्भातल्या लेकीची , जिला आत ही सोसावं लागतं अन बाहेरही . खरंच आपण निर्दय झालोत ?

जन्मा येण्याचं कारण स्त्री ,नात्यामधील गुंफण स्त्री
दुःखाला लिंपण स्त्री , मायेचा शिंपण स्त्री
झीजतांनाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन स्त्री
सर्व अर्थाने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री .

खरंच स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे .तिच्यामध्ये अफाट शक्ती आहे ,ऊर्जा आहे , क्षमता आहे , होती आणि राहणारच . त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे दुःखाचे प्रसंग आले तरी चटकन सावरणारी खंबीरपणे उभी राहणारी स्त्रीच असते . म्हणूनच म्हणतात जगातील सर्वात शक्तिशाली शक्ती म्हणजे तलवारीची धार आणि कलम याहीपेक्षा स्त्रीशक्ती ही सर्वात शक्तिशाली शक्ती आहे . म्हणून या शक्तीचा वापर आपल्या कुटुंबाचा , आपल्या देशाचा , जगाचा विकास करण्यासाठी करावा . फक्त चूल आणि मूल एवढाच तिच्या बाबतीत विचार न करता देश आणि विदेश याचा देखील विचार करणे खूप गरजेचे आहे तरच खरं महिला सबलीकरण झालं , सशक्तिकरण झालं असं म्हणायला काही हरकत नाही .
कोराना महामारीच्या काळात नर्स परिचारिका यांनीच अनेकांना जीवन दिले.
“नारी की निंदा मत करना
नारी नर की खाण
जिस खाण से पैदा हुए
शुक , भीष्म और हनुमान”,

लेखिका : श्रीमती.रतन अंबादास कराड जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव ता.हदगाव जि.नांदेड मो.नं.88 55 88 57 79

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.