प्रतिष्ठा न्यूज

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सातदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत विविध विषयांवर विचारमंथन

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त कन्या महाविद्यालय, मिरज आणि कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थीनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सातदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दिनांक 8 मार्च ते 14 मार्च या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून रोज सायंकाळी ६ वाजता अशी एकूण सात व्याख्याने झाली. सद्यस्थितीत महिलांना उपयुक्त ठरणाऱ्या अनेक विषयांवर या व्याख्यानमालेत विचारमंथन करण्यात आले. अशा प्रकारच्या व्याख्यानमालेच्या आयोजनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. व्याख्यानमालेचे उदघाटन प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. माधुरी देशमुख, माजी विद्यार्थीनी विभागाच्या प्रमुख डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विषेश म्हणजे काही माजी विद्यार्थिनींनी वक्त्या म्हणून या व्याख्यानमालेत उस्फूर्तपणे मार्गदर्शन केले.
पहिल्या दिवशी पोलीस हवालदार वंदना डामसे यांचे महिला सुरक्षा या विषयावर व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी वक्त्या कविता उगाणे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा यांनी डोळ्यासमोर उभ्या केल्या. तिसऱ्या दिवशी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर शीतल जाधव यांनी मांडणी केली. चौथ्या दिवशी सध्याची तरुणाई व पालकांच्या जबाबदाऱ्या या विषयावर बोलताना डॉ. मंजुश्री कुलकर्णी यांनी निकोप पालकत्व कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. भास्कर प्राणी यांनी महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि त्यावरील उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन केले. महिलांचे मानसिक आरोग्य हा सहाव्या व्याख्यानाचा विषय होता. याबाबत मानसतज्ञ स्नेहा पेंढे-जकाते यांनी मानसिक आरोग्य जपण्याचा मूलमंत्र दिला. शेवटचे पुष्प अंजुम जमादार यांनी गुंफले. शिक्षिका ते संस्थाचालक असा यशस्वी जीवनप्रवास उलगडत त्यांनी सर्वांनाच यशस्वी वाटचालीसाठी प्रेरित केले.
या व्याख्यानमालेतील सर्वच विषय उपयुक्त व विविध प्रकारच्या ज्ञानात भर घालणारे होते अशा भावना समारोपावेळी अनेकांनी व्यक्त केल्या. माजी विद्यार्थीनी संघामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थिनींना प्रेरक ठरत असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले. या व्याख्यानमालेचे संयोजन माजी विद्यार्थीनी संघाच्या अध्यक्षा कीर्ती महाजन, वनिता पवार, शीतल जाधव, कविता उगाणे, आशाराणी चौगुले, प्रा. सोनम कांबळे यांनी केले. तांत्रिक सहकार्य प्रा. बाबासाहेब सरगर, प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.