प्रतिष्ठा न्यूज

सांगलीकरांनी जागवल्या उल्हास देवळेकरांच्या आठवणी; छायाचित्रकार संघटनेतर्फे श्रध्दांजली सभा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २३ : राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन वृत्तपत्रात छायाचित्रांच्या माध्यमातून घडवणाऱ्या उल्हास देवळेकरांच्या असंख्य आठवणींना आज मान्यवरांनी उजाळा दिला. छायाचित्रण कलेत तीन पिढ्या कार्यरत असणाऱ्या देवळेकर परिवाराने वृत्तपत्रांसाठी छायाचित्रे देण्याचे काम व्रत म्हणून स्विकारल्याचे सांगत त्यांना श्रध्दांजली वाहिली.
जिल्हा छायाचित्रकार संघटनेतर्फे ‘सकाळ’ चे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. राजमती भवनात झालेल्या या सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खासदार संजय पाटील म्हणाले, दिलदार मनाचा मित्र अकाली गेल्याने वैयक्तिक नुकसान झाले आहे. राजकीय क्षेत्रात येण्याच्या पूर्वीपासूनच आमचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. कुटुंबियांच्या पाठीशी राहून सहकार्य करु.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, बालपणापासूनच देवळेकर परिवाराशी घरोब्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने जवळचा मित्र गमावल्याचे दुःख आहे. राजकीय क्षेत्रातील वाटचालीत माध्यमांसह छायाचित्रकारांचे सहकार्य राहिले आहे.
माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले, गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ देवळेकर परिवाराचे पाटील कुटुंबियाशी ऋणानुबंध आहेत. स्वभावाने मृदू व शांत असणाऱ्या उल्हास यांचे जाणे वेदनादायी आहे.
सांगली अर्बन बँकेचे संचालक सागर घोंगडे म्हणाले, सांगलीच्या इतिहासात देवळेकर, धामणीकर यांच्यासह गोखले, लिमये, घोंगडे यांची छायाचित्रण कला वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक क्षणांचे साक्षीदार राहिलेल्या उल्हास यांचा मृत्यू चटका लावणारा आहे.
छायाचित्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद खाडे म्हणाले, संघटनेसाठी ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. उल्हास यांचे सतत प्रोत्साहन व सहकार्य असायचे.
शिवसेना (ठाकरे गट) संघटक बजरंग पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. छाया जाधव, शिवसेना (शिंदे गट) संघटक सुनीता मोरे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुध्दे, सुधीर कुलकर्णी, अशोक घोरपडे, शिवराज काटकर, ज्येष्ठ निवेदक विजय कडणे, वृत्तवाहिनी संघटनेचे शंकर देवकुळे, आकाशवाणीचे केंद्र प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, व्यंगचित्रकार रोहित कबाडे, सावली निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर, किसान सभेचे उमेश देशमुख, ‘फेम’ व ‘आस्मा’चे सदस्य प्रकाश हुलवान, प्रा. आर.बी. शिंदे, प्रा. मिलिंद वडमारे, प्रा. एन.डी.बिरनाळे, एम. के. आंबोळे, रवींद्र चव्हाण, ॲड. रोहिणी आपटे यांनी मनोगतातून (स्व.) देवळेकरांच्या आठवणींना वाट करुन दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद शेंडगे, माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, ‘मराठा समाज’चे अध्यक्ष अभिजित पाटील, मिरज सुधार समितीचे तानाजी रुईकर, प्रा. जहांगीर तांबोळी, रमेश सहस्त्रबुध्दे, ज्येष्ठ पत्रकार आप्पा पाटणकर, शौकत नायकवडी, सायकलपटू दत्ता पाटील, शिवसेना (शिंदे गट) विधानसभा क्षेत्रप्रमुख नानासाहेब शिंदे, माजी नगरसेवक रवी देवळेकर, ‘आस्मा’चे सदस्य उमेश देसाई, सुधीर अनंतपूरकर, सचिन कांबळे, मराठा क्रांती मोर्चाचे नितीन चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नंदू गुरव यांनी सूत्रसंचालन केले. नीरज देवळेकर यांनी आभार मानले.

छायाचित्रकारांचा वीमा, देवळेकरांच्या नावे पुरस्कार…
नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी मनोगतात संघटनेतर्फे छायाचित्रकारांचा दहा लाखांचा वीमा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तर
छायाचित्रकार संघटनेतर्फे सुरेंद्र दुपटे यांनी जागतिक छायाचित्रकार दिनी (स्व.) उल्हास देवळेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नावाने दरवर्षी उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार सुरु करणार असल्याची घोषणा केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.