प्रतिष्ठा न्यूज

कोऱ्या कागदातून गुंजू लागले दाभोलकरांचे विचार !अंधशाळेतील विद्यार्थ्यांच्या कडून डॉ. दाभोलकरांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे अभिवाचन!

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज एमआयडीसी येथील नॅब संचलित सुशिलाबाई घोडावत निवासी अंधशाळेत आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे अभिवाचन अंधशाळेतील मुलांनी केले. अंध मुलांच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार रुजावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्या वतीने केले होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहा पुस्तिका ब्रेल लिपी मध्ये उषा अशोक येवले यांनी रूपांतरित केल्या आहेत.  या पुस्तकांचा एक संच अंनिसच्या वतीने अंधशाळेत भेट देण्यात आला. ब्रेल लिपी ही कोऱ्या कागदावर ठिपक्यापासून तयार झालेली असते. ही लिपी डोळस माणसाला समजत नाही, पण अंध व्यक्ती हाताच्या बोटाच्या स्पर्शाने ती वाचतात. त्यामुळे चक्क कोऱ्या पानांतून अंध मुलांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे डोळस विचार सर्वांना वाचून दाखवले.

यावेळी डॉ. दाभोलकरांच्या ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या ब्रेल पुस्तकातील काही उतारे साक्षी जाधव हिने तर ‘फलज्योतिष शास्त्र का नाही?’ या पुस्तकातील उतारे विशाल दिवटे याने आणि ‘चमत्कार सादरीकरण’ या पुस्तकातील उतारे प्रज्वल कुंभार यांने वाचून दाखवले. मुलांना हा पुस्तक अभिवाचनाचा कार्यक्रम खूपच आवडला. यावेळी अंध मुलांनी अनेक प्रश्न विचारले, त्यामध्ये ग्रहणामुळे अंध अपंगत्व येते का ?, वास्तुदोष असतो का?, बाधित जागी गेल्यानंतर ताप येतो आणि लिंबू टाकल्यानंतर ताप जातो हे कसे काय?, पहाटेची स्वप्न खरी होतात का? कावळा पिंडाला का शिवतो? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे अंनिस कार्यकर्त्यांनी मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगितली.

यावेळी अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, तुम्ही जरी अंध असला तरी तुमचे विचार डोळस आहेत. श्रद्धा अंध असली की ती आपल्याला अधोगतीकडे नेते. काही डोळस लोकांनी अंधश्रद्धेची झापडे आपल्या डोळ्यावर लावून घेतल्यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकांच्या डोळ्यावर असलेली ही अंध झापडे दूर करण्याचे काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ही पुस्तके करतील.

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते जगदीश काबरे म्हणाले की, मुलांनी आज या कार्यक्रमात जे प्रश्न विचारले ते लोकांचे डोळे उघडवणारे आहेत. डॉ. दाभोलकरांच्या या पुस्तकातून तुमची ज्ञान विज्ञानाची कवाडे उघडी होतील.

स्त्रीरोग तज्ज्ञ आणि अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे यांनी ग्रहण पाळल्यामुळे मुलं अंध अपंग जन्माला येतात ही एक अंधश्रद्धा आहे असे सांगितले. गुणसूत्रातील दोषामुळे अंध अपंग मुले जन्मतात, यामागचे आरोग्य विज्ञान यावेळी डॉ. निटवे यांनी मुलांना समजावून सांगितले.

प्रा.अमित ठाकर म्हणाले की, कोट्यावधी किलोमीटर दूर असणारे आकाशातील ग्रह तारे आपले भविष्य घडवू शकत नाहीत किंवा बिघडवू शकत नाहीत.

अंधशाळेचे चेअरपर्सन विष्णू नाना तुळपुळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या या ब्रेल लिपीतील पुस्तकामुळे आमच्या शाळेतील मुलांच्या मनातील अंधश्रद्धा दूर होतील, मुले विचारांनी डोळस होतील, ती निर्भय होतील असे सांगितले.

या कार्यक्रमास अंनिसचे कार्यकर्ते प्रा. अमित ठाकर, डॉ.सविता अक्कोळे, त्रिशला शहा, आशा धनाले, श्रद्धा कुलकर्णी इ.उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख कुचेकरी तर आभार मुख्याध्यापिका उज्वला हिरेकुडी यांनी मांडले. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना बारसे , मंजुषा वाकोडे, वृंदा सातपुते यांनी केले.

अंध मुलांच्या वैज्ञानिक उपक्रमास अंनिस कार्यकर्त्याकडून तीन लाखांची देणगी
या अभिवाचनाच्या कार्यक्रमात अंध मुलांची प्रश्न विचारण्याची आणि ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा बघून अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते जगदीश काबरे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी माधुरी काबरे यांच्या स्मरणार्थ अंध मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी अंधशाळेस रुपये तीन लाखाची देणगी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.