प्रतिष्ठा न्यूज

‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा ! – हिंदु जनजागृती समिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना मूल्ये, चारित्र्य शिकवणार्‍या धड्यात मनुस्मृतीतील ‘अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम ।’ (अर्थ : ज्येष्ठ नागरिक, पालक आणि शिक्षक यांचा आदर आणि सेवा करणार्‍यांचे आयुष्य, यश, विद्या आणि बळ वाढते.) या अर्थाचा श्लोक घेतला आहे. या श्लोकातून ज्येष्ठांचा आदर, सन्मान आणि सेवा करण्यास शिकवण्याचा उद्देश असतांनाही, केवळ तो मनुस्मृतीतील श्लोक असल्याच्या कारणावरून तथाकथित पुरोगाम्यांनी, त्यातही सनातन धर्माच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणार्‍या जितेंद्र आव्हाड यांनी विनाकारण सामाजिक वातावरण कलुषित करण्यास प्रारंभ केला आहे. कालच त्यांनी सोशल मिडियातून २९ मे २०२४ यादिवशी दुपारी १२ वा. महाड येथे मनुस्मृती हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला पाहिजे. तसेच त्यांच्या या सामाजिक विद्वेष करण्याच्या वक्तव्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांना निवेदन देऊन करण्यात आली. या वेळी अधिवक्ता उमेश आठवले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नितिन गावंड, सर्वश्री अविनाश पाटील, अतिश शिंदे आणि स्वप्नील गायकर उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड यांची प्रसिद्धीसाठी आणि मुंब्य्रातील मुसलमानांच्या मतांसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची पातळी महाराष्ट्राला चांगली माहिती आहे. यापूर्वीही त्यांनी मुसलमानांच्या मतांसाठी ‘सेव्ह गाझा’चे टी-शर्ट घालून फोटोसेशन केले होते. गुजरातमध्ये एनकाउंटरमध्ये मारली गेलेली मुंब्यातील आतंकवादी इशरत जहा हिच्या नावे चालू केलेली ॲम्ब्युलन्स सेवा लोक विसरले नाहीत. तसेच वर्ष २०२० मध्ये मंत्रीपदावर असतांना सत्तेचा वापर करत पोलिसांद्वारे अपहरण करून श्री. अनंत करमुसे या हिंदु कार्यकर्त्याला केलेली बेदम मारहाणीची छायाचित्रे आजही सोशल मिडियावर आहेत. वर्ष २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःच त्यांच्यावर २५ गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. सनातन धर्म, प्रभु श्रीराम यांच्या संदर्भात ते सातत्याने वादग्रस्त विधाने करत असतात.

मनुस्मृतीमध्ये समाजाच्या, स्त्रियांच्या विरोधातील श्लोकांच्या संदर्भात आक्षेप असल्याने ते मनुस्मृती जाळण्याचे आवाहन करत असतील, तर त्याच न्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ या ग्रंथात मुसलमानांच्या संदर्भात केलेल्या लिखाणाचा विचार ते करतील का ? केवळ दुसरे धर्म (हिंदु, जैन, बौद्ध, शीख, ख्रिस्ती आदी) त्यांच्या प्रेषिताला मानत नाहीत, म्हणून त्यांच्या निरपराध अनुयायांना काफीर ठरवून हत्या करण्याचे आदेश, या काफीरांच्या स्त्रियांवर बलात्कार करून गुलाम बनवण्याचे आदेश, तसेच त्यांची संपत्ती बळकावून ‘जिझिया’ कर लादण्याचे आदेश, त्यांची धार्मिक स्थळे उद्धवस्त करण्याचे आदेश जितेंद्र आव्हाडांना मान्य आहेत का? कि ते मनुस्मृती जाळण्याचा समान नियम या ग्रंथांनाही लावण्याचे धाडस दाखवतील? एकूणच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुन्हा मुसलमान मतांवर डोळा ठेवून त्यांचे हे हिंदूविरोधी षड्यंत्र तर नाही ना ? अशी शंका समितीने व्यक्त केली आहे.

श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.