प्रतिष्ठा न्यूज

स्वाभिमानी लोकसभेच्या सहा जागा लढविणार : माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती; सांगलीची उमेदवारी महेश खराडे यांना मिळणार?

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : यापुढे शेतकर्‍यांची चळवळ एवढे एकमेव लक्ष असून इतर कोणत्याही राजकारणात आम्हाला रस नाही. सभागृहात शेतकर्‍यांचा आवाज पोहचला पाहिजे यासाठी स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदार संघामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे. लोकांची मागणी असेल तर सांगलीच्या जागेवर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना संधी दिली जाईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजू शेट्टी म्हणाले, आम्ही आमच्या कार्यकारणीच्या बैठकित इतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसा कोणाकडून प्रस्तावही आलेला नाही. राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा व परभणी या सहा लोकसभा मतदार संघामध्ये आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. शेतकर्‍यांची चळवळ टिकली पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही निवडणूक लढणार आहोत. हातकणंगले मतदार संघातून स्वत: राजू शेट्टी लढणार आहेत. तर रविकांत तुपकर यांची उमेदवारी निश्‍चित आहे. इतर चार मतदार संघामध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यावेळी पत्रकारांनी सांगलीची जागा कोण लढविणार असा प्रश्‍न विचारला असता राजू शेट्टी म्हणाले, सांगलीचा उमेदवार अजून निश्‍चित केलेला नाही. परंतु लोकांची मागणी असेल तर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना उमेदवारी देण्याबाबत विचार केला जाईल.
ईडीने सरसकट सर्वांची चौकशी करावी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली. याबाबत विचारले असता राजू शेट्टी म्हणाले, सत्ताधारी पक्षामध्ये असणार्‍या कोणाची चौकशी होत नाही. विरोधात असणार्‍या नेत्यांच्या चौकशा केल्या जात आहेत. त्यांना नोटीसा पाठविल्या जात आहेत. यावरून शासकीय यंत्रणा या सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यानेच काम करत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे चौकशाच करायच्या असतील सरसकट सर्व नेत्यांच्या केल्या पाहिजेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.