प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांना म्हणजेच मोदींना मत देऊन भारताच्या विकासाचा मार्ग मोकळा करा : देवेंद्र फडणवीस; कडेगावातील सभेला हजारोंचा जनसागर

प्रतिष्ठा न्यूज
कडेगाव प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक ही देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी असून संजयकाकांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं मत आहे. मोदींना मतदान करून देशाच्या विकासाचा मार्ग मोकळा करा, असे आवाहन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. सभेला हजारोंचा जनसागर लोटला होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशमुख यांनी बिनधास्त राहावे त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनशी आहोत. सध्याची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असून देशाचा नेता कोण? देशाचा विकास कोण करणार? सर्वसामान्यांचा हित कोण जोपासणार? हे ठरवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीत दोनच पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे भाजपा महायुतीचे नरेंद्र मोदी आणि दुसरे राहुल गांधी आहेत. देशाला सक्षम करणारी आणि पुढे नेणारी महायुती आहे तर दुसऱ्या बाजूला 26 पक्षांची खिचडी असणारी राहुल गांधींची पार्टी आहे. एका बाजूला मोदीजींचं मजबूत इंजन आहे ज्या इंजिनला दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, मराठा, धनगर अशा सर्वांसाठी जोडलेली बोगी आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, शरद पवार, लालुंचा मुलगा असे फक्त इंजीन असणारे नेते आहेत. ज्यामध्ये बसायला सामान्य माणसाला जागा नाही. इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो परंतु मोदींनी विकासाच्या अनेक बोगी त्यांच्या इंजिनला जोडलेल्या असल्यामुळे निश्चितपणे देशाचा विकास होणार आहे. संजयकाकांना मत देऊन सांगली जिल्ह्याची बोगी आपण भारतीय जनता पार्टीच्या इंजिनला जोडूया. असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ या विस्तारित योजनांसाठी हजारो कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोदीजींनी 26 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी आणि कारखाना कारखानदारांना एम एस पी दिली. 65 वर्षाच्या काळात काँग्रेसने जे साखर उद्योगासाठी केले नाही ते भाजपाने करून दाखवले. महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत .चाळीस लाख बचत गट निर्माण केले. या बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जागा आरक्षित करण्यात आले आहे. दहा वर्षात 25 कोटी कुटुंबाला दारिद्र्यरेषेतून मुक्त केले. एक मजबूत देश नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला आहे. मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. आता ती आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. कोरोना काळात शास्त्रज्ञांच्या माध्यमातून मोदीजींनी लस तयार करून घेतली. 140 कोटी जनतेला ती दोन वेळा केली. त्यामुळे तर आपण सर्वजण जिवंत राहू शकलो. 2019 ला पाकिस्तानात बसून सर्जिकल स्ट्राइक केला आणि आतंकवाद्यांना धडा शिकवला. त्यानंतर देशात एकदाही बॉम्बस्फोट झालेला नाही. आत्ताचा भारत देश हा रडणारा नाही तर लढणारा आहे.
सात हजार किलोमीटर वर हल्ला करणारे ब्रह्मोस मिसाईल आपण तयार केले आहे. देशाची प्रगती करण्यासाठी आपण संजयकाकांना मत द्यावे. संजयकाकांना म्हणजेच नरेंद्र मोदींना यांना मत देऊन देशाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वागत पलूस कडेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी केले. उमेदवार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भाषणे झाली.
पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेत्या नेता केळकर, भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे, अमरसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहित पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी आभार मानले.

*देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला गणपतराव देशमुख यांची आठवण होते ते एकदा म्हणाले होते की त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भाजपला विरोध करण्यामध्ये घालविले. परंतु दुष्काळी भागाला पाणी युती सरकारमुळेच मिळाले.*

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.