प्रतिष्ठा न्यूज

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा आईनेच प्रियकराच्या मदतीने केला खून : पोलिसही चक्रावून गेले; सांगलीच्या खानापूर तालुक्यातील घटना

प्रतिष्ठा न्यूज
खानापूर प्रतिनिधी : अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने आईनेच खून केल्याचा खळबळजनक प्रकार लेंगरे (ता. खानापूर जि. सांगली) येथे उघडकीस आला. सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी आईने केला होता. एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला. प्रकरण पाहून पोलिसही चक्रावून गेले.

याप्रकरणी विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५, रा. जोंधळखिंडी, ता. खानापूर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा आहे. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रूपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.
दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रूपेश या दोघांच्या अनैतिक प्रेम संबंधाची माहिती पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ माजली आहे.
गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडुरंग कनेरे आणि पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.