प्रतिष्ठा न्यूज

आरक्षणासाठी रविवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार; सहकुटुंब सहभाग : समाज मोर्चाच्या तयारीत तर नेते पक्षीय कार्यक्रमात मश्गुल 

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : मराठा समाजाला ५० टक्केच्या आतून ओबीसीतूनच आरक्षण द्यावे  आणि जालना येथील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या प्रमुख मागणीसाठी रविवार दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकणार आहे. आरक्षणाचा प्रश्न गंभीर आणि समाजाच्या अस्मितेचा असतानाही समाजातील नेते पक्षीय कार्यक्रमांध्ये मश्गुल आहेत. नेत्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी  रस्त्यावर उतरावे अन्यथा त्यांना जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.ओबीसी समाजातील नेते समाजाविषयी आपली भूमिका स्पष्ट करीत आहे. मात्र मराठा आरक्षणाबद्दल समाजातील नेते गप्प आहेत. त्यामुळे समाजाच्या आमदार, खासदार यांनी आपली भूमिका जाहीर करावी. पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेऊन समाजाच्या हिताचा विचार करावा.  इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून मराठा समाज आरक्षण मागत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज करून नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाची सुरवात रविवारी सकाळी १० वाजता सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून होईल. राममंदिर चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे. प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. मात्र त्यादिवशी रविवार आहे. त्यामुळे समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आणि निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
राज्यभर आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना समाजातील नेते पक्षीय कार्यक्रमांध्ये मश्गुल आहेत. त्यामुळे नेत्यांविषयी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.   

प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी 
समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी, आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी बैठका सुरु आहेत. मात्र समाजातील प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून आपआपल्या गावात बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन करावे. तसेच मोर्चात सहकुटुंब सहभागी झाले पाहिजे. 

मोर्चाला आर्थिक नको वस्तू स्वरुपात मदतीचे आवाहन
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गेल्यावेळी काढलेल्या महामोर्चात अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली होती. याही मोर्चाला मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजातील लोकांनी मोर्चा यशस्वी होण्यासाठी मदत करावी. मात्र यावेळी कोणतीही आर्थिक मदत न देता वस्तू स्वरुपात मदत करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सांगलीत कार्यालय सुरू
सांगलीत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी येथील जिल्हा परिषद समोरील रणजित एम्पायर येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन अश्विनी रणजित पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.