प्रतिष्ठा न्यूज

डॉल्बीच्या दणक्याने युवकाचा बळी ; तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील घटना

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कवठेएकंद येथे डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे शेखर पावसे या युवकाचा बळी गेला आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाचा आदेश फाट्यावर मारून तासगाव पोलिसांच्या समोर डॉल्बीचा दणदणाट सुरू होता.पोलिसांनी जर योग्य वेळीच डॉल्बीवर कारवाई केली असती तर कदाचित शेखरचा जीव वाचला असता,अशी चर्चा परिसरात आहे.
याबाबत माहिती अशी कवठे एकंद येथे सोमवारी रात्री अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होते.विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रत्येकाने डॉल्बीची व्यवस्था केली होती.सायंकाळी सात वाजल्यापासूनच गावातील चौका चौकात डॉल्बीचा दणदणाट सुरू होता.मिरवणुकीच्या निमित्ताने तासगाव पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता.मात्र विविध मंडळांनी तासगाव पोलिसांच्या नाकावर टिचून तसेच न्यायालयाचा डेसिबल बाबतचा आदेश फाट्यावर मारून डॉल्बी सुरू केला होता.डॉल्बीसमोर युवकांचा धिंगाणा सुरू होता.अक्षरशः कानाचे पडदे फाटतील इतक्या प्रचंड आवाजात डीजे सुरू होते.काही वेळात या डॉल्बीच्या चालकांमध्ये अक्षरशः आवाजाची स्पर्धा लागली. एकमेकांना खुन्नस देऊन आवाज वाढवण्यात आला.हा सगळा प्रकार तासगावचे पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहत होते.विसर्जन मिरवणुकीत शेखर पावसे हा युवकही आला होता. शेखर याची आठ ते दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाल्याचे समजते. तरीही तो गणेश विसर्जन मिरवणुकीत आला होता.रात्री स्टॅन्ड चौकात या मिरवणुका आल्यानंतर डॉल्बीचा आवाज त्याला सहन झाला नाही. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागले त्यामुळे त्याला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.या प्रकरणात जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवले असते तर कदाचित हा प्रकार घडला नसता.शेखरचा जीव वाचला असता,अशी चर्चा आता कवठेएकंद येथे सुरू आहे.
शेखर याचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता.कमी वयात युवा उद्योजक म्हणून त्याने नावलौकिक मिळवला होता.काही वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. त्याला चार वर्षाची लहान मुलगीही आहे.मात्र अँजीओप्लास्टी झाली असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकेत डॉल्बी समोर जाणे त्याच्या जीवावर बेतले.पोलिसांनीही आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीलाच योग्य पावले उचलली असती तर शेखरचा बळी गेला नसता. याबाबत आता तरी पोलिसांनी तालुक्यातील डॉल्बीबाबत आक्रमक भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
*कवठेएकंद येथील दुसरी घटना…!*
डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे बळी जाण्याची कवठेएकंद येथील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अंदाजे दहा वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाजाचा दणका सहन न झाल्याने मनोहर जाधव यांचाही हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला होता.दहा वर्षानंतर पुन्हा शेखर पावसे याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत आता पोलिसांसह गावकऱ्यांनीही डॉल्बीबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.