प्रतिष्ठा न्यूज

आपण लढू आणि जिंकू : विशालदादा पाटील; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; लढण्याचा निर्धार पक्का

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले कॉंग्रेसचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या उमेदवारीचा घोळ अद्याप मिटलेला नाही. काल शुक्रवारी आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते दिल्ली येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विशालदादा पाटील यांनी समाज माध्यमातून एक पत्र लिहून कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भावनिक साद घातली आहे. आपण लढू आणि जिंकू असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा निर्धार पक्का केला आहे. या पत्राची कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पत्रामध्ये लिहिले आहे की,
मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.

स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे कि, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू…

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.