प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या पारध्याच्या पोरगीची राज्यात चर्चा

गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलला तिच्या रेखा शॉर्टफिल्मची निवड,राज्यातून एकमेव फिल्म,युवा दिग्दर्शक शेखर रनखंबे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील माया पवार ही पारध्याची पोरगी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलीय. गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमधे तिने अभिनय केलेल्या *रेखा* या शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली आहे. या फेस्टिवलला देशातून २० शॉर्टफिल्म निवडल्या आहेत तर महाराष्ट्रातून एकमेव ही शॉर्टफिल्म निवडण्यात आली आहे,अशी माहिती तासगाव तालुक्यातील पेड गावचा युवा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी दिली. २० ते २८ नोव्हेंबर रोजी हा फेस्टीवल गोव्यात आहे.
भंगार गोळा करणाऱ्या बायका,भीक मागणाऱ्या,जत्रतनी वस्तू यिकनाऱ्या बायका दिसायला देकन्या आस्त्यात पन त्या स्वच्छ का राहात न्हायत, तासगाव तालुक्यातल्या पेड गावच्या युवा दिग्दर्शकाला प्रश्न पडला.तळापातूर गेला आनी तेला त्यातलं याच भयानक वास्तव फूड आनलं,घान राहन तेंची मजबुरी हाय. ह्यो विषय घिऊन तेन शॉर्टफिल्म लिहली.
नटरंग ,रेगे, टाईमपास,बालक पालक, बालगंधर्व आसल ताकतीच पिच्चर तयार करणारा मराठी चित्रपट सृष्टीतले लेखक,निर्माता,दिग्दर्शक रवी जाधव यांनी तासगाव तालुक्यातल्या पेडच्या या शेखर रणखंबे या तरण्याबांड पोराच्या कामाची दखल घितली.शेखरच्या धोंडा आणि पेंम्प्लेट या शॉर्ट फिल्म न गोव्याला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल हालवून सोडलं.रेखा नावाची शॉर्टफिल्म त्याने रवी जाधव यांच्या सोबत किली. मानसांपासन,शूटच्या जागा सारे अधिकार त्याला मिळाले.मानस तेंन यिचून काडली. रेखाची अभिनेत्री म्हनून तेन तासगावच्या चरण्या पारध्याची नात माया पवारला घेटलं. काय जन तेज्या या निर्णयान हादरली. पन शेखरंन त्यासनी सारं समजून सांगितलं.तासगावात जागा बगून प्रॅक्टिस सुरू झालं.सांगलीच एसटी स्टॅन्ड,हरिपूरला जवळच्याच भागात शूट झालं.मापात बजेट,त्यात कोरोना. पन गड्यांन यावर मात किली.
रेखा तयार व्हायला युवा दिग्दर्शक शेखर संग क्यामेरा प्रताप जोशी,संकलन वैभव जाधव,ध्वनी संयोजन मंदार कमलापूरकर,सचिदानंद टिकम, प्रॉडक्शन हेड कुलदीप देवकुळे आनी जिल्ह्यातलीच पोरं राबली.रेखा तयार झाली.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या राष्ट्रीय शॉर्टफिल्म स्पर्धेत रेखान बाजी मारली.
गोव्यात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मधे आपली फिल्म यावी म्हणून भली भली मानस देव पाण्यात घालून बसतात. या  फेस्टीवलसाठी देशातून २० शॉर्टफिल्म घेण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातून एकमेव ही रेखा शॉर्टफिल्म आहे.सांगली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
 रेखाच्या अभिनेत्रीच घर जाळलं:
रेखा या शॉर्टफिल्मच शूटिंग चालू आसतानाच या अभिनेत्रीच लोकांनी घर जाळलं.सांगलीच्या वन विभागाला फक्त पारध्यांच वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमन दिसलं.वन विभागान पारध्यांच मन लावून तात्काळ झोपड्या विस्कटून अतिक्रमण काडलं.त्यांना बेघर केल.पारधी मजी चोरचं हायत आमच्यातल्या काय आती शिकल्याल्या लोकांसनी वाटतंय. आनी व्यावस्थेला तेंनी चोरच राह्यलं पायजी.मजी गावान केल्याल्या भानगडी तेंच्या माथ्याव माराय येत्यात.त्यासनी मानसावानी जगायचाय.पन आमी जगून देत नाय. तासगावातल्या पारध्याच्या पोरीच्या अभिनयाची राज्यात चर्चा हाय. तेंच्यात चोर बगायपेक्षा कवातर तेंच्यातली कला पन बगा…
शेखर रनखंबे दुसरा नागराज मंजुळे….
धोंडा, पॅम्पलेट सारख्या वेगळ्या धाटणीच्या फिल्म शेखरने या आधी केल्यात.समाजातील संवेदनशील व जिवंत विषय हाताळन्यात त्याचा मोठा हातखंडा आहे.पॅम्पलेटची दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलला निवड झाल्यानंतर रेखा ही त्याची दुसरी फिल्म आहे. वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारे नामांकित दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रमाणे शेखर रनखंबे हा दुसरा नागराज मंजुळे असल्याचे बोलले जातेय.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.