प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा प्रीमियर लीग २०२३ : सांगशीच्या संघाला विजेतेपद तर साखरी संघ उपविजेता

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२५ : गगनबावडा प्रीमियर लीग आयोजित गगनबावडा प्रीमियर लीग २०२३(पर्व सहावे) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा निवडे ( ता. गगनबावडा) येथील मैदानावर पार पडल्या. तालुक्यातून आठ संघातून १२० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. चुरशीच्या अंतिम सामन्यात सांगशीच्या क्रिकेट संघाने यंदाचे विजेतेपद पटकावले तर साखरी क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम दिवशी स्पर्धेचा थरार अनुभवत क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने प्रत्यक्ष मैदानावर खिळून होते. लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेही हजारो प्रेक्षक स्पर्धेशी जोडले गेले होते.
या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरला. अंतिम सामना सांगशी संघात महेंद्र पाटील, आनंदा अडुळकर, व शाहरुख तर साखरी संघात इंद्रजीत , यासर नाकाडे, आदिनाथ कोटकर यांचा समावेश असलेल्या या तुल्यबळ संघात होणार असल्याने फलंदाजी विरुद्ध गोलंदाजी असा अपेक्षेप्रमाणे चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पहावयास मिळाला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना साखरी संघाने सात षटकात १२४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरा दाखल सांगशी संघाच्या षटकार किंग आनंद आडुळकर ने ११ चेंडूत ३६ तर तितक्याच चेंडूत महिंद्र पाटील याने ३२धावा धावा ठोकल्या. व ७० धावांच्या भागीदारी नंतर पाठोपाठ बाद झाले. सुनियोजित (कॅल्क्युलेटेड) फलंदाजी साठी प्रसिद्ध असणारा महेंद्र उर्फ माही बाद झाल्यानंतर संघांचे थोडे दडपण वाढले होते.सामना रंगातदार अवस्थेत पोहोचला.पण शाहरुख याने सुंदर व धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन घडवत नाबाद ३९ धावा करत सांगशी संघाला विजयाप्रत नेले.व चषकावर संघाचे नाव कोरले. त्यालाच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घोषित करण्यात आला.
विजेत्या सांगशी संघास चषक व ५१ हजार, उपविजेत्या साखरी संघास चषक व ३५०००, उत्तेजनार्थ शेनवडे व निवडे प्रत्येकी दहा हजार, मालिकावीर महेंद्र पाटील, सांगशी
संघ, सर्वोत्कृष्ट फलंदाज आनंद आडुळकर सांगशी संघ, सर्वोत्कृष्ट गोलंदाज यासर नाकाडे, साखरी संघ यांना देण्यात आला. गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय कोटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे आयोजन इंद्रजीत पाटील, क्रांतीसिंह सावंत,आर आर पाटील, अमोल पाटील, अजित कदम यांनी केले. स्पर्धेचे धावते समालोचन उत्कृष्ट व अभ्यास पूर्ण होते.
यावेळी यावेळी रमेश पाटील, शरद पवार, लहू पाटील, गणपती पाटील,दीपक पाटील, सरपंच,दगडू भोसले,संदीप पाटील, अमर कांबळे, पिंटू पाटील, अक्षय पडवळ, प्रथमेश पडवळ आदि क्रिकेट शौकीन ग्रामस्थ उपस्थित होते.

*** क्षणचित्रे ***
पंच मनोहर गिरी चौकार व षट्काराची खुणा वेगळ्याच शैलीत करत होते. त्यामुळे लोकांचे मनोरंजन झाले.

सांगशी संघाचा गोलंदाज मनोज पडवळ याचे हातभर वळलेले चेंडू पाहून समालोचकांनी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध गोलंदाज शेनवार्न याच्याशी तुलना केली.

सांगशी संघाचा फलंदाज महेंद्र पाटील याची फलंदाजी कॅल्क्युलेटेड (सुनियोजित ) असल्याने त्याचे भविष्य उज्वल असल्याचे मान्यवर क्रीडा रसिकांनी सांगितले.

“आमच्या संघाने गगनबावडा प्रीमियर लीग २०२२ मध्ये कोदे येथील मैदानावर याच स्पर्धेचे उपविजेते तर असलज येथील लीगमध्ये विजेतेपद मिळवले होते. संघाची कामगिरी सातत्याने सुधारत आहे. या परिसरातील मुलांमध्ये दूरचित्रवाणीचे वेड कमी व्हावे, त्यांना व्यायाम व्हावा. मानसिक सक्षम राहावेत,युवा पिढी शारीरिक द्रिष्ठया तंदुरुस्त राहावी. सांघिक शक्ती वाढावी. निव्वळ याच हेतूने मी गेली ५ वर्ष मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ”
– राजेश पाटील
(संघमालक, सांगशी संघ. व सामाजिक कार्यकर्ते)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.