प्रतिष्ठा न्यूज

चालत्या बसला पाठीमागून ट्रकची जोरदार धडक; एक ठार २० जण गंभीर जखमी : विजयपूर-गुहागर महामार्गावर मुचंडी जवळची घटना

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : विजयपूर – गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर मुचंडी जवळ चालत्या बसला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने एक जण मयत झाला आहे. तर 20 हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी झाले. यातील आठ जखमींना कर्नाटकातील विजयपुर येथे हलविण्यात आले. तर जत ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या 10 जणांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयतामध्ये गुरुपाद राजेंद्र बिरादार (वय 26, रा. विजयपुर) हा ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान मयत झाला आहे.
सांगोला डेपोची बस (क्र. एम एच 40 एन 9551 ) ही एस.टी.बस सांगोला -विजापूर अशी आहे. ही बस सांगोला येथून जत येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आली. दहा मिनिटे थांबा घेऊन ही बस विजयपुरकडे निघाली. जत तालुक्यातील मुचंडी थांबा घेऊन पुढे एक की. मी. अंतरावर कर्नाटक हद्द लागते. कर्नाटक हद्दीच्या अलीकडे महाराष्ट्र हद्दीतच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने बसचा पाठीमागील पत्रा उचकटून आतील प्रवाशी बसलेल्या लोकांच्या सीटा देखील फाटल्या. त्यामूळे जखमी असलेल्या सर्वच प्रवाशांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याच्या गाड्या तातडीने जत मधुन रवाना झाल्या. जत येथील रूग्णवाहिका व संख येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीला हलविण्यात आले. जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची नावे अशी: कोसरदाणू शब्बीर पितले (वय 35), रेखा विष्णू आरले 35, स्मिता रावसाहेब ठोंबरे, आश्र्विनी रावसाहेब ठोंबरे, गजाबाई सुखदेव गायके 56, सावित्री राजेंद्र बिरादार 46, रोहिणी शिवराज मलकापूर 27, गजराबाई सुखदेव वाघमारे 58, सुंदराबाई वाघमारे 27 (सर्व रा. विजयपुर).

सर्वच जखमी प्रवाशांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. आठ ते दहा रूग्ण हे विजयपुर येथे हलविण्यात आल्याने त्या जखमींची माहिती व नावे मिळू शकली नाहीत. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.