प्रतिष्ठा न्यूज

नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन, गुरूवारपर्यंत चालणार मेळावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत नव तेजस्विनी दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे-पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने-खरात, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे तेजस जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळ रांजणीचे व्यवस्थापक डॉ. सचिन धडस, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमराणीकर आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा संदेश वाचन करण्यात आले. त्यानंतर विजयमाला माने-खरात यांनी महिलांचे मानसिक – शारीरिक आरोग्य व आहार या विषयावर मार्गदर्शन केले. अजयनाथ थोरे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. संप्रदा बीडकर यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन केले. तसेच, तेजस जाधव यांनी महिला बचत गट व कर्जवितरण यासंदर्भात मार्गदर्शन केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. बचत गटातील महिलांनी प्रार्थना गायन केले. प्रास्ताविकात कुंदन शिनगारे यांनी सर्व नागरिकांनी या दिवाळी मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन आनंद हाबळे यांनी केले. आभार कल्पेश उमराणीकर यांनी मानले. यावेळी माविमचे जिल्ह्यातील सर्व सीएमआरसीचे स्टाफ, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्थापित महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांच्या मालाची विक्री वाढावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला आहे. वेलणकर मंगल कार्यालय सांगली येथे दि. 9 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत हा मेळावा सुरू राहणार असून, त्यात जिल्हाभरातील 35 महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले दिवाळी फराळ, फराळाचे विविध मसाले, ड्राय फ्रुट्स, कलाकुसरीच्या वस्तू, आकाश कंदील, पणत्या, लाईटच्या माळा, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, सुवासिक अत्तरे, उटणे, ज्वेलरी, लहान मुलांची कपडे, केरसुणी व झाडू, विविध खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू एका छताखाली मिळणार आहेत. तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.