प्रतिष्ठा न्यूज

आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास यश निश्चित : अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ३० : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे जे शासनाचे धोरण आहे, त्याचाच एक भाग म्हणून युवा महोत्सव आयोजित केले जातात. आयुष्यामध्ये चांगले करण्याच्या हेतून पुढे गेल्यास निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्घाटन शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली येथे अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर विभागाचे क्रीडा व मुख्य सेवा उपसंचालक माणिक पाटील, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, नवभारत शिक्षण मंडळाचे गौतम पाटील, राजेंद्र पोळ, महेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, क्रीडा युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांचा सहभाग वाढावा, शासनाच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने स्वत:मध्ये जे चांगले आहे ते देण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामधील जे कलागुण आहेत ते पुरेपूर दाखविण्याचा प्रयत्न करावा, यातूनच उद्याचे खेळाडू घडत जाणार आहेत. युवा महोत्सवामध्ये अधिकाधिक संख्येने सहभाग घ्यावा असे सांगून त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोल्हापूर विभागाचे क्रीडा व मुख्य सेवा उपसंचालक माणिक पाटील यांनी शासनाच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा, असे आवाहन केले. कृषी उपसंचालक प्रिंयांका भोसले यांनी कोणत्याही स्पर्धा महत्वाच्या असतात, स्पर्धेमधून सर्वांगीण विकास होतो असे सांगितले. पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांनी मनोगत व्यक्त केले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात किरण बोरवडेकर यांनी प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगून यावर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले. युवकांनी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार यांनी केले. आभार क्रीडा मार्गदर्शक जमीर शेख यांनी मानले. या कार्यक्रमास परीक्षक, क्रीडा कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी तसेच युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.