प्रतिष्ठा न्यूज

ड्रिमगर्ल शर्वरी पवार बनल्या शोषित महिलांच्या आधारस्तंभ : ‘मी दुर्गा’ नव्या चळवळीचा प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज / तानाजीराजे जाधव
सांगली दि.२८ डिसेंबर २०२२ : सौंदर्याचे वरदान व कोकीळेचा कंठ लाभलेल्या ड्रिमगर्ल दबंग शर्वरी पवार यांनी प्रचंड संघर्ष करून मिडियामध्ये स्वत:च्या नावाचा ब्रँड निर्माण केला. परंतु काही बड्या धेंडांनी त्यांना शोषणाची शिकार बनविले. ‘युज ऍण्ड थ्रो’ पध्दतीने वार्‍यावर सोडून दिले. यातुन मोठ्या धिरोदात्तपणे त्या बाहेर पडल्या. स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे, अशा समाजधारणेत बदनामीचे डंख सहन करत तावून सुलाखून निघत त्यांनी स्वत:ला सावरले. बलात्कार, लैंगिक शोषण आणि फसवणुक झालेल्या मोलकरणीपासून ते उच्चविद्याभुषीत महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य दुर्गा फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केले. स्वत: शोषणाचे विष पचविल्यानंतर शोषणाची शिकार बनलेल्या समाजाच्या दृष्टीने अबु्रचे धिंडवडे निघालेल्या शेकडो शोषित महिलांच्या त्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कुणा स्त्री अथवा मुलीचे शोषण होऊ नये यासाठी ‘‘मी दुर्गा’’ ही चळवळ त्या चालवत आहेत. ‘तीचा’ जागर च्या संपादक संचालक डॅशिंग, सौंदर्यवती ड्रिमगर्ल शर्वरी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनसंघर्षावर एक प्रकाशझोत…
मिडियातील एक ग्लॅमर्स गर्ल आणि तितकीच डॅशिंग दबंग पत्रकार अशी स्वत:ची ओळख शर्वरी पवार यांनी केली. वयाच्या सोळाव्या वर्षी अँकर म्हणून सांगलीच्या पत्रकारीतेत मुलीची एंट्री हा चर्चेचा ठरला. कथ्थक विशारद असल्याने डान्स टिचर म्हणूनही काम केले. कुटुंबाच्या सर्व पारंपारिक मर्यादा ओलांडून कर्तृत्वाच्या आकाशात त्यांनी उंच झेप घेतली. आपल्या कोकीळकंठी आवाजाची जादू आणि दर्जेदार सादरीकरणामुळे त्या प्रेक्षकांच्या आवडत्या अँकर बनल्या. त्यांनी न्यूज मिडिया प्रेस क्लब ऑफ सांगली या संघटनेची स्थापना केली. हे पुरूष प्रधान संस्कृतिचे अवडंबर माजविणार्‍यांच्या डोळ्यात खुपले. त्यांनी शर्वरी पवार यांच्या ग्लॅमर प्रतिमेची बदनामी सुरू केली. दबावाचे राजकारण सुरू झाले. वैयक्तीक आयुष्यातही विष पेरले गेले. बदनामीच्या व्हायरसने त्यांचे प्रेमी जीवन उद्ध्वस्त केले. स्त्रीला आयुष्यातून उठविण्याचा सोपा मार्ग म्हणजे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे. असेच शर्वरी मॅडम यांच्याबाबत घडले. यासर्वांवर मात करत पत्रकरीतेतील आपलं अस्तित्व त्यांनी टिकवलं. मुलाचा सांभाळ करत मातृत्वाची जबाबदारीही पेलली. कधी कधी त्या मानसिकदृष्ट्या कोलमडून पडायच्या. निराधार स्त्री नेहमीच आधाराच्या शोधत असते. तिला रक्तपिपासू बलात्कारी नजरांपासून, हैवानांपासून संरक्षण हवे असते. काय करावे? कुणाचा आधार घ्यावा काही काही सुचत नव्हते. अशा परिस्थितीत त्या एका मोठ्या माणसाच्या संपर्कात आल्या. संपर्कातून जवळीक आणि जवळीकतेतून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांना वाटलं आता हाच आपला आधार आहे. परंतु त्यांची निराशा झाली. गोड बोलून खोटी अश्‍वासने देऊन त्या नेत्याने लैंगिक शोषण केल्याची भावना शर्वरी मॅडम यांच्या मनात निर्माण झाली. रक्षकच भक्षक बनले तर मग न्याय मागायचा कुठे? मिडियापुढे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या वाट्याला बदनामी शिवाय काहीच आले नाही. लोक त्यांनाच दोष देऊ लागले. लोकांच्या नजरा जास्तच विखारी बनल्याचे त्यांना दिसू लागले. एका लुटल्या गेलेल्या स्त्रीच्या मनात अशा परिस्थितीत आत्महत्येचे विचार येऊ लागले. आपल्यानंतर आपल्या बाळाचे काय? त्याच्या संगोपणाचा प्रश्‍न होता. अत्यंत विमनस्क अवस्थेत असतानाच त्यांनी एके ठिकाणी न्याय मागण्याचे ठरविले. तिथेही पहिल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली. आगीतून उठून फुफाट्यात पडण्याचाच हा प्रकार होता. बाईचे शरीर म्हणजे वाट्टेल तशी उपभोगण्याची संधी या मानसिकतेच्या त्या बळी ठरल्या. पुन्हा एकदा शर्वरी मॅडम ढासळल्या. त्यांचे अंतरमन पोखरून निघाले. उद्ध्वस्त झालेलं प्रेम, आणि त्यानंतर झालेलं शोषणं यामुळं त्यांच्या आयुष्याची जणू राखरांगोळी झाली. कसेही वागले तरी बुरसटलेल्या लोकांच्या टोमण्यांचा दर्प येऊ लागला. जगण्यात अर्थ नाही असे वाटू लागले. पुढे काय? हा जीवन-मरणाचा प्रश्‍न होता.
बाईचे शरीर म्हणजे मलई, मस्का जो लुटण्याची संधी मिळाली की काही पुरूष कसे हैवान होतात. पिसाळलेल्या कुत्र्यासारखे लचके तोडायचा प्रयत्न करतात. याचा अनुभव त्यांनी घेतला होता. अशा परिस्थितीत स्वत:चे जीवन पुन्हा एकदा संपविण्याचे विचार मनात घोळत होते. दु:खावेगाने अश्रुंना वाट मोकळी करून द्यावी लागत होती. त्याचवेळी एक महिला तिचं गार्‍हाणं मांडण्यासाठी शर्वरी मॅडम यांच्याकडे आली. राखेतून फिनिक्स पक्षी उठावा त्याने आकाशात उंच झेप घ्यावी आणि मृत्यूवरही मात करावी, तशी त्यांच्या मनाने भरारी घेतली. स्वत:ला बोचणी असताना, स्वत: सगळी दु:खे भोगलेली असताना त्यांनी स्वत:चे अश्रु पुसत पुढील आयुष्य जगण्याचे उद्दीष्ट ठरविले. ज्यांनी त्यांचे शोषण केले त्यांनाही त्यांनी अद्दल घडविली. दुर्गा फौंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून महिलांसाठी संघर्ष सुरू केला. त्यांच्यातली रणरागीणी जागी झाली. राज्यभरातील महिला व मुलींचे शोषण होऊ नये यासाठी त्यांनी मन:शक्तीच्या बळावर ‘मी दुर्गा’ या चळवळीचा प्रारंभ केला. पत्रकारीतेतला झंझावात आता सामाजिक क्षेत्रात उतरला. राज्यभरातील शेकडो महिला त्यांच्याकडे आपली गार्‍हाणे मांडण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या. साध्या मोलकरणीपासून डॉक्टर, इंजिनिअर आणि काही उच्च पदस्थ अधिकारी महिलाही त्यांच्या लैंगिक शोषणाची, फसवणूकीची प्रकरणे घेऊन त्यांच्याकडे येत आहेत. मनातून पूर्णत: कोसळलेल्या मरणाच्या वाटेवर असणार्‍या शेकडो उद्ध्वस्त महिलांचा शर्वरी मॅडम आधावरड बनल्या आहेत. ‘मरायचं नाही तर लढायचं’ हा विचार त्यांच्या मनात रूजवत आहेत. बदनामीच्या भितीने आपले आयुष्य संपवून घेऊ नका. तर संबंधितांना धडां शिकविण्यासाठी सज्ज व्हा! असे आवाहन त्या सर्व स्त्रीयांना करत आहेत.
स्वत: आगीतून बाहेर पडलेल्या शर्वरी मॅडम आहेत. ज्या पोरींचे जीव जात आहेत. ज्या पोरी फसत आहेत. ज्या पोरींच्या आयुष्याचं मातरं होत आहे. ज्या पोरींना ‘युज ऍण्ड थ्रो’ पध्दतीने वापर करून फेकून दिले जात आहे. अशांसाठी मॅडम जगत आहेत. ‘मुलींनो जाग्या व्हा’ अशी साद घालत आहेत. विशेष करून राजकीय नेते अनेक तरूण पोरींचा, महिलांचा वापर करतात. शोषण करतात. अशा मुलींपुढे एकतर आत्महत्या करणे किंवा वाईट मार्गाला लागणे असे पर्याय उभे राहातात. कारण समाज त्यांना सुखाने जगू देत नाही. अशा वेळी आपण खंबीरपणे सर्वांना धिराने तोंड देत उभे राहिले पाहिजे. पोरींनी पुरूषांपासून जपून राहिले पाहिजे. राजकीय लांडग्यांपासून स्वत:ला जपले पाहिजे. त्यांचा सहवास, अश्‍वासने आणि प्रसिध्दी हे सगळं क्षणभंगुर आहे. राजकीय नेते, कार्यकर्ते अथवा कोणाच्याही श्रींमतीला, प्रसिध्दीला, गोडबोलण्याला भुलून जीव लावून स्वत:चा जीव धोक्यात टाकू नका. नंतर ज्यांच्याकडे न्याय मागायचा त्या यंत्रणाही आपल्याबरोबर राहत नाहीत. असे शर्वरी मॅडम सांगत आहेत. दुर्गा फौंडेशनच्या माध्यातून रस्त्यावर उतरण्याचीही तयारी त्यांनी ठेवली आहे. ‘मी दुर्गा’ ही चळवळ राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहचत आहे.
अत्यंत गुंतागुंतीची प्रकरणे त्यांच्याकडे येत आहेत. बाईच्या आब्रुचे धिंडवडे कसे काढले जातात, बाईचं जगणं आजच्या एकविसाव्या शतकातही किती भयंकर आहे हे त्यांच्याकडे आलेल्या अनेक प्रकरणांतून समोर येते. आठरा वर्षांपर्यंत बापाच्या घरात राहायचे. बापाचे नाव, अडनाव लावायचे. लग्नानंतर नवर्‍याचे नाव, अडनाव लावायचे. परंतु बाईच्या आयुष्यात जर काही वेडेवाकडे घडले. बलात्काराचा प्रसंग घडला तर तिला सासर आणि माहेर दोन्हीकडून आधार मिळत नाही. एका प्रकरणात अशी अवस्था आहे की नवरा त्याचे अडनाव लावू देत नाही आणि माहेरचेही त्यांचे अडनाव लावू द्यायला तयार नाहीत. बाईचं जगणं लाचारीचं, ना घर का ना घाट का असेच आहे का? असा सवाल शर्वरी मॅडम समाजाला विचारत आहेत. समाज कितीही वाईट वागणूक देत असला तर बाईनं आतून आणि बाहेरून खंबीर असायला हवं. वेळ प्रसंगी तिनं दुर्गेचा अवतार धारण करायला हवा. स्वत:च्या पायावर उभं राहून स्वावलंबी व्हावं. हा विचार त्या मांडत आहेत.


स्वत: शोषणाची शिकार झाल्यानंतर घाबरून, गांगरून जाऊन आत्महत्या करण्याऐवजी शर्वरी मॅडम आपल्या आयुष्यात धाडसाने उभ्या राहिल्या. त्यांनी गरूड भरारी घेतली. आणि इतरांना न्याय देण्यासाठी लढू लागल्या आहेत. भारतीय जनमत, तीचा जागर हे उद्योग सक्षमपणे सांभाळत सामाजिक क्षेत्राततही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांची आई एकेकाळी राजकारणात होती. तिचा वारसा जोपासत शर्वरी मॅडमनी राजकारणात उतरायला हवे. राजकीय वजन निर्माण केले तर अनेकांना त्या मोठा आधार देऊ शकतील. अंगावर कपडे असले तरी शोषण, बलात्कार आणि बदनामीच्या संकटाने समाजाच्या दृष्टीने विवस्त्र बनलेल्या शेकडो महिलांचा आधार बनलेल्या शर्वरी मॅडनी आता पुढचे पाऊल राजकारणात टाकायला हवे. अनेक उघड्या पडलेल्या महिलांचे आब्रु झाकण्याचे आणि बदनामीचे कलंक पुसण्याचे कार्य करणार्‍या शर्वरी पवार मॅडम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.