प्रतिष्ठा न्यूज

हातनोलीच्या खाजगी सावकार पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल… तालुक्यात खाजगी सावकारीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : खाजगी सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा असे आदेश काढणाऱ्या माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबांच्या तालुक्यातच खाजगी सावकारांनी पुन्हा डोके वर काढण्याचे चित्र बघायला मिळत आहे.
हातनोली येथील खासगी सावकार पती-पत्नीने एकाकडून पाच लाखाच्या कर्जापोटी ४० लाख रुपये वसूल केले आहेत.तसेच आणखी १ कोटी २० लाखांची मागणी करीत त्यांनी फिर्यादीस मारहाण सुद्धा केली असून या खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून फिर्यादीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.महात्माजी निवृत्ती निकम (वय ५५) असे फिर्यादीचे नाव आहे.*पै.शिवाजी नारायण जाधव व त्याची पत्नी कृषी सहाय्यक श्रद्धा शिवाजी जाधव* या दोघांविरूद्ध खासगी सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तासगाव पोलिसात दाखल झाला आहे.
फिर्यादी महात्माजी यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे.या व्यवसायासाठी त्यांनी गावातील खासगी सावकार शिवाजी जाधव व त्याची पत्नी श्रद्धा जाधव यांच्याकडून २०२१ मध्ये दरमहा २० टक्के व्याजाने पाच लाख रुपये घेतले होते.या दिलेल्या कर्जावर चक्रवाढ व्याजाची आकारणी करून सावकारांनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच मारहाण करून पाच लाखापोटी ४० लाख रुपये वसूल केले आहेत.अजूनही एक कोटी २० लाख रुपयांची मागणी जाधव पती,पत्नी करीत होते.एक तर पैसे दे,नाही तर मर,अशी धमकी ते फिर्यादी महात्माजी यांना देत होते.महात्माजी यांनी शिवाजी याच्या त्रासाला कंटाळून सहा दिवसापूर्वी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अत्यवस्थ अवस्थेत महात्माजी यांना त्यांच्या नातेवाईकांनी तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.त्यानंतर पोलिस हवालदार संकपाळ यांनी रुग्णालयात भेट देऊन फिर्यादी महात्माजी यांचा जबाब घेतला असता त्यांनी संशयित शिवाजी व श्रद्धा यांच्याविरोधात खासगी सावकारी व आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून तेव्हा पासून खाजगी सावकार शिवाजी जाधव हा फरार असल्याचे समजते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.