प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत भाजपच्या प्रचाराचा झंजावात; संजयकाकांचा अर्ज गुरुवारी दाखल होणार ; फडणवीस, बावनकुळे यांची सभा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार माननीय खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात आता गती घेऊ लागला आहे. ते गुरुवारी (दिनांक १८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी अकरा वाजता स्टेशन चौकात पक्षातर्फे जाहीर सभा होणार आहे.
भाजप आणि महायुतीने आता प्रचाराच्या झंजावाताला सुरुवात केली आहे. त्यासाठी सभा, प्रचार बैठका, प्रचार फेऱ्या यांचे पद्धतशीरपणे नियोजन पूर्ण झाले आहे. शनिवारी पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारणीची बैठक झाली. त्या पाठोपाठ महिला मोर्चा, किसान मोर्चा, ओबीसी आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी आणि कामगार आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. या बैठकांना पदाधिकारी आणि सभासद अत्यंत उत्साहाने आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे,आमदार सुधीरदादा गाडगीळ, पक्षाचे नेते शेखर इनामदार,शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी महापौर संगीता खोत,पक्षाच्या नेत्या सौ. नीता केळकर, भारती दिगडे ,सौ. सविता मदने, सुनील वाघमोडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, महिला आघाडीप्रमुख गीतांजली ढोपे पाटील,मुन्ना कुरणे आदींनी बैठकात मार्गदर्शन केले.
शेखर इनामदार म्हणाले, आता प्रचाराची गती आपल्याला वाढवायची आहे.ही निवडणूक अटीतटीची समजूनच आपण लढायची आहे. कोणीही गाफील राहू नये. संजयकाकांचे मताधिक्य विक्रमी झाले पाहिजे अशा दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. दोन ते तीन जणांचा गट करूनच महिलांनी तसेच कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक घरात जावे. महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागांमध्ये प्रचाराला गती आली पाहिजे. सर्व पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक या सर्वांनी प्रचाराची धुरा आता सांभाळली पाहिजे. प्रचार सकारात्मक दृष्टिकोनातूनच झाला पाहिजे. केंद्र, राज्य सरकार तसेच महापालिका क्षेत्रात झालेल्या विविध विकास कामांची माहिती आणि मिळालेल्या सुविधा यांची माहिती लोकांना दिली पाहिजे.
इनामदार यांनी सांगितले की गुरुवारी संजयकाका पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर स्टेशन चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षातर्फे जाहीर सभा होईल. ही सभा ऐतिहासिक ठरेल असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करायचा आहे.
दरम्यान पक्षातर्फे विविध उपक्रम सध्या सुरू आहेत. मतदार याद्यांचे बूथनुसार वाचन, त्याचे अहवाल वरिष्ठांना पाठवणे, तसेच बूथ नुसार आणि शक्ती केंद्रानुसार टिफिन बैठका असे उपक्रम सुरू आहेत. किसान मोर्चातर्फे पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली टिफिन बैठकांचा उपक्रम सुरू आहे.
पक्षातर्फे आता नमो संवाद बैठका आणि सभा सुरू होणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातच ८० नमो संवाद सभा होणार आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक बूथ प्रमुखांना नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.