प्रतिष्ठा न्यूज

प.पू. चर्याशिरोमणी आचार्य १०८ श्री. विशुद्धसागर मुनी महाराज यांचा २६ त्यागींसह ससंघ सन २०२४ चा ३५ वा पावन वर्षायोग (चातुर्मास) १४ जुलै पासून नांदणी येथे होणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील ७४३ गावांचे अधिपत्य असलेल्या अतिप्राचीन धर्मपीठ नांदणी (जि. कोल्हापूर) येथे प.पू. चर्याशिरोमणी आचार्य १०८ श्री. विशुद्धसागर मुनी महाराज यांचा २६ त्यागींसह ससघ सन २०२४ चा ३५ वा पावन वर्षायोग (चातुर्मास) संपन्न होत आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चातुर्मास कमिटीचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब जि. पाटील, कर्नाटक विभागाचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब नाडगोंडा, चातुर्मास कमिटीचे महामंत्री डॉ. अजित ज.पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केले.

प.पू. आचार्यश्री विशुध्दसागरजी मुनिश्रींच्या या विशाल संघाचा या भागातील हा प्रथमच चातुर्मास (वर्षायोग) संपन्न होत असल्यामुळे प.पू. जगत्गुरु स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महास्वामीजींच्या मंगल अधिनेतृत्वाखाली हा चातुर्मास भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्याचा मानस असून आचार्यश्रींच्या प्रभावी वाणीने या भागातील श्रावक श्राविकांना ही एक आध्यात्मिक पर्वणी लाभणार आहे. यासाठी जिनसेन संस्थान मठ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ आणि सकल जैन समाज, नांदणीच्यावतीने चातुर्मासाचे नियोजन सुरू आहे रविवार, दि.१४ जुलै २०२४ रोजी सकाळी ७.२५ वा. नांदणी नगरीमध्ये भव्य मंगल प्रवेश होणार आहे. तर शनिवार, दि. २० जुलै २०२४ रोजी दु. १.०० वा. श्री अतिशय क्षेत्र नांदणी येथे भव्य चातुर्मास कलश स्थापन्याचा कार्यक्रम संपन्न होईल. यासाठी द्वादशांग कलश, सोलहकारण कलश आणि महाऋध्दि कलशांची उद्घोषणा करण्यात आली असून या कलशांचे वितरण चातुर्मास कमिटीतर्फे करण्यात येत आहे. तरी या भव्य मंगल प्रवेश व आध्यात्मिक सोहळ्यास सांगली, कोल्हापूर व कर्नाटकातील श्रावक – श्राविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा व मुनिश्रींच्या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या

 यावेळी नांदणी मठाचे ट्रस्टी प्रा. आप्पा भगाटे, ज्येष्ठ जैन साहित्यिक डॉ. चंद्रकांत चौगुले, वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

*प.पू. आचार्यमुनिश्रींचा परिचय*

चर्याशिरोमणी प.पू. १०८ आचार्यश्री विशुद्धसागरजी महाराज हे जैनधर्म व अध्यात्माचे प्रकांड पंडित, जैन साहित्याचे प्रगाढ चिंतक, चारही अनुयोगांचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा जन्म १९७१ साली मध्य प्रदेशमधील भिंड या जिल्ह्यातील रूट या गावी झाला. यांचे गृहस्थाश्रमीचे नाव बाल ब्रम्हचारीचे श्री. राजेंद्रकुमारजी जैन (लल्ला) असे होते. त्यांनी दि. १६ नोव्हेंबर १९८८ साली तीर्थक्षेत्र बरासौजी येथे वयाच्या १७ व्या वर्षी बाल ब्रम्हचारी व्रत धारण केले तर दि.११ ऑक्टोबर १९८९ साली भिंड येथे क्षुल्लक दीक्षा घेतली आणि त्यावेळी त्यांचे नामकरण प.पू. यशोधर सागर महाराज असे केले. दि.१९ जून १९९९ साली पन्ना (मध्यप्रदेश) येथे ऐलक दीक्षा घेतली. तर मध्यप्रदेशातील तीर्थक्षेत्र श्रेयांशगिरी (जिल्हा पन्ना) येथे गणाचार्य आ. श्री. १०८ वीरागसागरजी मुनी महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली आणि ते प.पू. विशुद्धसागर मुनीराज झाले. तसेच प. पू. गणाचार्य श्री १०८ वीरागसागरजी महाराज यांनी दि. ३१ मार्च २००७ साली महावीर जयंतीच्या दिवशी प.पू. विशुद्ध सागरजी महाराज यांना आचार्यपद दिले.प.पू. आचार्य श्री विशुद्धसागर महाराज यांनी आत्तापर्यंत सुमारे १,२५,००० कि.मि. पायी विहार केला आहे. त्यांनी जवळजवळ २५० ग्रंथांची रचना केली आहे. तसेच ५००० नितीकाव्ये लिहिली आहेत. आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये जवळजवळ १५० हून अधिक पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सानंद संपन्न झाले आहेत. प.पु. आचार्यश्रींचे आजपर्यंत ३४ वर्षायोग संपन्न झाले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.