प्रतिष्ठा न्यूज

निमणीच्या ‘प्रकाश उपसा’मध्ये कोट्यवधींचा अपहार : बाळासाहेब पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : निमणी येथील प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशीत अनेक गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवले आहे,अशी माहिती संस्थेचे माजी संचालक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रकरणी दोषींवर कारवाई करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी,अशीही मागणी पाटील यांनी केली आहे.
यावेळी पाटील म्हणाले संस्थेच्या गैरकारभाराबाबत तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार दिली होती,त्यांनी सांगलीच्या जिल्हा उपनिबंधकांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार संस्था अधिनियमन 1960 चे कलम 83 अन्वये संस्थेची चौकशी करण्यात आली.ए.एस.पैलवान यांनी चौकशी करून संस्थेतील नियमबाह्य कारभारावर बोट ठेवले आहे.
या चौकशीत अनेक मुद्दे चव्हाट्यावर आले आहेत.संस्थेच्या गैरकारभाराबाबत पैलवान यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, संस्थेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेची 60 लाख रुपये पाणीपट्टी बुडवली आहे.संस्थेने पोटनियमात तरतूद नसताना बेकायदेशीर रित्या गोडाऊन बांधकामावर 20 लाख रुपये खर्च केले आहेत.संस्थेने संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ मस्के यांनी संस्थेच्या 11 लाख 65 हजार रुपयांची बेकायदेशीर इतर संस्थेत गुंतवणूक केली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने नियमबाह्यरित्या सुमारे 1 कोटी 28 लाख रुपयांची पाणीपट्टी माफ केली आहे.विहिरीत पाणी घेणाऱ्या सभासदांनी संस्थेची 2 लाख 73 हजार इतकी पाणीपट्टी भरलेली नाही. बिगर सभासदांची सुमारे दोन लाख 82 हजार 100 रुपये तारण नसलेल्या क्षेत्राची पाणीपट्टी वसूल केलेली नाही. एकनाथ मस्के व लक्ष्मी मस्के यांच्या मालकीच्या तारण नसलेल्या क्षेत्राची 5 लाख 80 हजार इतकी पाणीपट्टी वसूल केलेली नाही. योजना भाग भांडवल पोटी 1 लाख 96 हजार रुपये सभासदांचे कडून वसूल केलेले नाहीत.याशिवाय संस्थेने गेल्या पाच वर्षात नियम डावलून लिकेज खर्चावर 23 लाख, दुरुस्ती व देखभाल खर्चावर 24 लाख, भांडवली खर्चावर 52 लाख इतका बेफाम पैसा खर्च केला आहे.संस्थेचे कामकाज व कायदा पोटनियमास अनुसरून नसल्याचे निदर्शनास आणून,चौकशी अधिकाऱ्यांनी संस्था मयत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेताना दुजाभाव करीत आहे, थकबाकी असताना हितसंबंधी सभासदांना विहिरीत पाणीपुरवठा केला जात आहे,संस्थेने तासगाव तालुका ग्लुकोज सहकारी संस्थेमध्ये 50 हजार रुपये शेअर भांडवल पोटी गुंतवणूक केली आहे, संस्थेच्या बँक खात्यावरील रकमा मोठ्या प्रमाणावर रोखीने काढण्यात आल्या आहेत, चेकने व्यवहार केलेले नाहीत, संस्थेच्या भाग भांडवलात सभासद निहाय तफावत आहे,कार्यक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रास पाणीपुरवठा केला जात आहे, lज्या सभासदांनी तारण क्षेत्राची विक्री केली आहे त्यांचे भाग भांडवल परत केलेले नाही, अशा अनेक मुद्द्यांवर चौकशी अधिकाऱ्यांनी बोट ठेवले आहे.
याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे.याप्रकरणी दोषी संचालकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी,अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.