प्रतिष्ठा न्यूज

पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधातील खोट्या तक्रारीविरुद्ध उद्या तहसीलसमोर धरणे आंदोलन : तासगाव तालुक्यातील गौण – खनिज उत्खननाची चौकशी करा – पत्रकार संघाची तहसीलदारांकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तासगाव तालुक्यात गौण – खनिज तस्करांनी नंगा नाच सुरू केला आहे. वाळू, मुरूम माफियांनी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची लूट सुरू केली आहे. स्टोन क्रशर चालकांनी तर उभ्या डोंगराला सुरुंग लावून निसर्गावरच बलात्कार करण्यास सुरुवात केली आहे. या गौण खनिज उत्खननाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना दिले आहे.

तर दैनिक पुढारीचे पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या गौण खनिज तस्करांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पत्रकार संघाच्या वतीने उद्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

तासगाव तालुक्यात गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे वाभाडे काढणारी लेखमाला दैनिक पुढारीने सुरू केली आहे. ही लेखमाला सुरू होताच तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या बुडाखालील बचबच लपवण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. तर या तस्करांकडून हप्ते मिळवून आपले खिसे भरणाऱ्या महसुलाच्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच फाटली आहे. तालुक्यातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांची सखोल चौकशी झाल्यास काळेबेरे बाहेर येणार आहे.

दरम्यान, ही लेखमाला सुरू करणाऱ्या पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात तस्करांनी खोटी तक्रार दिली आहे. या तक्रातीबाबत कोणतीही सत्यता पडताळून न पाहता कर्तबगार पोलिसांनीही जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खोटा गुन्हा दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात तासगाव तालुक्यातील पत्रकार आक्रमक झाले आहेत. खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. या मागणीसाठी उद्या शुक्रवार तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुळात वाळू, मुरूम तस्कर तसेच उभ्या डोंगराला नागवून निसर्गाची ‘वाट’ लावणारे स्टोन क्रशर चालक हे काय साधू संत नाहीत. ही मंडळी फार अब्रुवान आहेत असे नाही. आपले काळे धंदे चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची थुंकी झेलणारे तसेच त्यांचे खिसे गरम करणारी ही मंडळी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवून महसूल विभागाला चुना लावत आहेत.

स्टोन क्रशर चालकांची कशीही आणि कधीही चौकशी केल्यास त्यांचे काळेबेरे चव्हाट्यावर येणार आहे. महसुलचे अधिकारी मात्र दर महिन्याला मिळणाऱ्या बिदागिमुळे चिडीचूप आहेत. गौण खनिज तस्करांकडून हप्ते गोळा करण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. गौण – खनिज तस्कर व त्यांना पाठिंबा देणारे हप्तेखोर अधिकारी हे स्वतः काचेच्या घरात राहतात. पत्रकारांनी या मंडळींच्या बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातल्यास एकाचेही क्रशर सुरू राहणार नाही. मात्र तरीही ही मंडळी पत्रकारांवर तक्रार करण्याचे धाडस दाखवत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.