प्रतिष्ठा न्यूज

स्त्रीला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारी क्रांतीकारक म्हणजे सावित्रीबाई फुले: जेष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार

प्रतिष्ठा न्यूज 
मिरज प्रतिनिधी : अज्ञानाच्या अंधःकारातून, रूढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करून माणसाला समाजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी महात्मा जोतिबांच्या खांद्याला लावून स्वतःचे आयुष्य प्राणपणाला लावणारी माय म्हणजे सावित्रीबाई फुले होय. पुरुषसत्ताक पद्धतीचे उच्चाटन, जातीभेद निर्मूलन, सनातनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी स्त्रीने शिकलेच पाहिजे अशी क्रांतीची ज्योत पेटवणारी व  स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणून मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारी आद्य क्रांतिकारक म्हणजे सावित्रीबाई फुले होय, असे विचार जेष्ठ विचारवंत व लेखक प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व कन्या महाविद्यालय, मिरज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेत ते वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. संस्थचे सचिव श्री. राजू झाडबुके, जवाहर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरजच्या मुख्याध्यापिका सौ. रिज्वाना मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.
         थोर महापुरुषांचे विचार विद्यार्थी, शिक्षक व संपूर्ण समाजापर्यंत पोहचावेत या हेतूने प्रतिवर्षी शिवाजी विद्यापीठामार्फत विविध व्याख्यानमालांचे आयोजन केले जाते. त्यातील सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला आयोजित करण्याची संधी मिरजेतील कन्या महाविद्यालयास मिळाली. या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आजचे स्त्री वास्तव’ असा विषय निवडण्यात आला होता. या व्याख्यानमालेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. माधुरी देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. रमेश कट्टीमणी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
       यावेळी बोलताना डॉ. कुंभार म्हणाले, पशुत्व हटवून मनुष्यत्व आणण्याची ताकद फक्त शिक्षणात असते. शिक्षणातून फक्त साक्षर साक्षर होणे गरजेचे नसून योग्य-अयोग्य यातील फरक कळण्याची मती यावयास हवी. कारण फक्त अडाण्यांचा समुदाय स्वातंत्र्य आणू शकत नाही आणि स्त्री सुधारणा घडवू शकत नाही. आजचा काळ पुन्हा प्रतिगामी विचारांकडे वाटचाल करताना दिसतो आहे त्यामुळे स्त्रीने पुन्हा त्या बंधनात अडकता कामा नये. आज दीडशे वर्षे उलटून गेली असली तरी आपण पूर्णतः स्त्री म्हणून स्वतंत्र झालो आहोत का, समानतेच्या हक्कदार झालो आहोत का  याचा विचार प्रत्येक स्त्रीने करणे गरजेचे आहे. क्रांती करावयाची असेल तर आपल्यावर झालेल्या    अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची व त्याविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य स्त्रीकडे असायला हवे. विचारवंत, समाजसुधारक, तत्त्वचिंतक, समाजचिंतक असणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आजच्या स्त्रियांनी आपल्या जीवनात अंगी बाळगायला हवा असा बहुमोल सल्लाही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
      महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी सगळी सांसारिक सुखं बाजूला सारून समाजपरिवर्तनासाठी आपले जीवन समर्पित केले. अशा त्यागाच्या व समर्पणाच्या बळावरच आपला आधुनिक भारत उभा आहे. अशा थोर व्यक्तींना समजून घेणे आणि त्यांचे विचार अंगिकारण्याची आज गरज आहे.
       या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. कु. सोनम कांबळे यांनी केले. प्रा.बाबासाहेब सरगर यांनी आभार मानले. आयोजनासाठी प्रा. मानसी शिरगावकर, डॉ. शबाना हळंगळी, प्रा. विद्या भोसले यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या व्याख्यानमालेत महाविद्यालयातील विद्यर्थीनींसह, सांगली, मिरज व आजूबाजूच्या परिसरातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.