प्रतिष्ठा न्यूज

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रतिष्ठा न्यूज 

कोल्हापूर  प्रतिनिधी : हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, 12 फेब्रुवारी 2023 या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे सायंकाळी 6 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी 10 फेब्रुवारीला शहरात वाहनफेरी काढण्यात आली. या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्‍या घोषणा यांमुळे अवघे कोल्हापूर शहर भगवेमय झाले होते. या वेळी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, भारत मातेचा विजय असो, हिंदु एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वंदे मातरम् यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यांमुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

 

प्रारंभी मिरजकर तिकटी येथे हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाचे पूजन शिवसेना करवीरतालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) श्री. राजू यादव हस्ते करण्यात आले. यानंतर कोळेकर तिकटी, पाण्याचा खजिना, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विष्णुपंत इंगवले कमान, गांधी मैदान, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे मिरजकर तिकटी येथे फेरीचा समारोप झाला. फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी फेरीचे स्वागत करण्यात आले. फेरीच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. श्री. किरण दुसे यांनी 12 फेब्रुवारीला होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या फेरीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, श्री. सूरज राजपूत आणि त्यांचे सहकारी, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, ऋणमातृभूमी संघटनेचे श्री. राजू गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमलाकर किलकिले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. मधुकर नाझरे, तसेच शिये, भुये, शिरोली, कसबा सांगाव या गावांमधील धर्मप्रेमी फेरीसाठी उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवणार्‍या फेरीने कोल्हापूरवासियांचे मन जिंकले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.