प्रतिष्ठा न्यूज

जनता फंदफितुरीच्या विरोधी, नेत्यांची गद्दारी मात्र जनता काँग्रेसलाच मतदान करणार : पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१० : कत्रांटी नोकरी.. सेवाशाश्वती नाही, पेन्शन नाही. बेरोजगारी, महागाईने जनता होरपळून निघत आहे.
यामुळे जनतेत प्रचंड मोठा असंतोष आहे. १५ लाख नागरिकांच्या खात्यात, २ कोटी नोकऱ्या , शेतकरी उत्पन्न दुप्पट करणार अशा थापा मारून भाजपा सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. आता २०२४ ची निवडणूक जिंकता येणार नाही हे पक्क लक्षात आल्याने शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडले.. इडीच्या भितीने नेते गेले. महाराष्ट्रातील जनतेला फंदफितुरी कधीच आवडत नाही. नेत्यांनी गद्दारी केली तरी जनता काँग्रेसलाच मतदान करणार आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या खोतवाडी – बिसूर पूलाचे उद्घाटन व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी
विशालदादा पाटील उपस्थित होते.

सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नाने महाआघाडी सरकारच्या काळात खोतवाडी – बिसूर ओढ्यावरील पुलासाठी १कोटी ७५ लाखाचा निधी मंजूर झाला व पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

खोतवाडी, वाजेगाव व नांद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनेलच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या सत्कार करून त्यांना विकास कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.इंद्रजित चव्हाण कराड, कर्नाळ उपसरपंच नासिर चौगुले व सोसायटी चेअरमन अनिल एडके व शहाजीराव जाधव यांचा सत्कार झाला. महावीर पाटील आणि सारिका मोहिते यांनी पुलाच्या कामामुळे जनतेची चांगली सोय झाली असे मनोगत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, ‘खोतवाडी, वाजेगाव व नांद्रे या गावांना नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांचे सतत अथक काम सुरु असते.या भागात आपण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये भरघोस मताधिक्य दिले. त्याची जाणीव ठेवून पृथ्वीराज पाटील यांनी पुलासाठी निधीचा प्रस्ताव आमच्याकडे दिला. तो मंजूर केला. हा पूल या भागातील शिक्षण, आरोग्य व दळणवळण यासाठी खूप महत्वाचा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आपण विजय संपादन करुन काँग्रेस पक्षाचा झेंडा व विचार मजबूत केला आहे त्याबद्दल पक्षाकडून मी आपले अभिनंदन करतो.२०२४ मध्ये सरकार आपलंच येणार आहे. विकास कामाचा महापूर आणू.

श्रीराम हा देव प्रत्येक भारतीयांचा आहे. श्री राममंदिराला काँग्रेसचा विरोध हा भाजपाचा खोटा प्रचार आहे. अयोध्येचा खटला हा विश्वस्त संस्थांमधील होता. तो सर्वोच्च न्यायालयाने सोडवला. जनतेच्या पैशातून श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिर उभे केले आहे. ते केंद्रातील भाजपा सरकारचे काम नाही.

यावेळी विशाल पाटील यांनी या भागातील जनता कायम काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आहे. २०२४ च्या निवडणुकीत या भागातील मताधिक्य नक्कीच मोठे असणार आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी पूलासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत या तिन्ही गावानं आम्हाला चांगले मताधिक्य दिले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तिनही गावात काँग्रेस प्रणित पॅनेलची सत्ता आली. पूर्वीपासूनच काँग्रेस पक्ष व विचारधारा मानणारी ही गावे आहेत. कोरोना व महापूर काळात आम्ही कायम जनतेला मदत केली आहे. खोतवाडी बिसूर दरम्यान पावसाळ्यात ओढा भरुन वहात असल्याने संपर्क तुटत होता ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन
सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. अशोक चव्हाण व तत्कालीन महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांना भेटून पूल तातडीने झाला पाहिजे अशी कैफियत मांडली व नाबार्ड योजनेतून निधी तरतूद करुन घेतला. या कामी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचेही सहकार्य लाभले आहे. पूल बांधकामावेळी लोकांनीच चांगले लक्ष ठेवले होते. आज या पुलाचे उद्घाटन पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्या हस्ते झाले. या भागासाठी आजचा दिवस सोनियाचा दिन आहे. येणारी लोकसभा व विधानसभा जिंकून काँग्रेस मजबूत करु या.

पूलाचे काम मजबूत झाले आहे. या पुलामुळे लोकांची गैरसोय दूर झाली. आमदारकीची सत्ता नसताना पृथ्वीराज पाटील यांनी पुलाचे काम पूर्ण केले.त्यांना धन्यवाद देतो असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक वसंत सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.
आभार माणिक कालेकर यांनी मानले. यावेळी खोतवाडी, वाजेगाव, नांद्रे, बिसूर, कर्नाळ व बुधगाव या गावातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.