प्रतिष्ठा न्यूज

कवी-लेखकांनी व्यक्तिमत्त्व समृध्द केले पाहिजे : प्रा. प्रदीप पाटील; जगद्गुरू तुकोबाराय जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : आपण किती श्रीमंत आहोत, यापेक्षा आपण विचारांनी आणि अनुभवाने किती समृध्द आहोत यावरच आपल्या लेखनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणून कवी-लेखकांनी विचार व अनुभवांनी व्यक्तिमत्त्व समृध्द केले पाहिजे, असे प्रतिपादन इस्लामपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील यांनी केले. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्यावतीने जगद्गुरू तुकोबाराय जीवन गौरव पुरस्काराने त्यांना पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
सांगली येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा रविवार दि. १९ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष अभियंता सचिन पवार, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार हे प्रमुख उपस्थित होते. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कार्याध्यक्षा सौ. मनिषाताई पाटील हारोलीकर यांनी आभार मानले.
प्रा. प्रदीप पाटील म्हणाले, मला अनेक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. परंतू मराठा समाजाने दिलेला पुरस्कार म्हणजे घरच्या माणसांनी पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आहे. जीवन गौरव पुरस्कार वयाच्या सरते शेवटी दिला जातो. परंतु जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने वयापेक्षा साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे,याचा निश्‍चितपणे अभिमान आहे. साहित्यिकांनी अभ्यासाने आपली वैचारीक समृध्दी वाढविली पाहिजे. जो विचारांनी समृध्द आहे तो समाजातील तळागाळातील घटकांना न्याय देणारे लेखन करू शकतो,असे सांगून त्यांनी साहित्यपरंपरेची मीमांसा केली.
मुख्य अभियंता डॉ. हेमंत धुमाळ म्हणाले, साहित्यिकांनी जाणिवपूर्वक समाजाच्या वेदना मांडल्या पाहिजेत. विशेष करून इतिहासाचे विकृतीकरण थांबविण्यासाठी पुढकार घेतला पाहिजे. इतिहास दुरूस्त करून लोकांच्या समोर मांडला पाहिजे. तरच आपण वैचारीक गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. प्रा. प्रदीप पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे विचार आणि लेखन मराठी साहित्याला संपन्न करणारे असे आहे.
यावेळी, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष नितीन चौगुले, अशा पाटील, प्रा. विष्णू वासमकर, प्रा. आबासाहेब पवार, ज्येष्ठ लेखक आप्पासाहेब पाटील, राहुल पाटील, मुबारक उमराणी यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.