प्रतिष्ठा न्यूज

स्थगिती उठवायला दिलेले खासदारांचे पत्र बोगस सहीचे : विश्वास पाटील यांचा आरोप; पत्रकार परिषदेस रोहित पाटलांसह महत्वाचे कार्यकर्ते गैरहजर

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी 14 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी आमदार सुमन पाटील यांच्याच प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र सध्याच्या सरकारने या कामाला स्थगिती दिली. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने राज्यातील कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे ज्या पत्राने ही स्थगिती उठवली असे सांगत आहेत ते पत्रच बोगस आहे. या पत्रावरील खासदारांची सही बोगस आहे. या पत्रावरही जावक क्रमांक नाही, असाही घणाघाती आरोप पाटील यांनी यावेळी केला.

तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी मंजूर झालेल्या निधीवरून आमदार – खासदार गटात श्रेयवादाचे राजकारण पेटले आहे. दोन्ही गटांनी हा निधी आमच्याच प्रयत्नातून मंजूर झाल्याचे ठासून सांगितले आहे. त्यावरूनच पोस्टर व पेपरबाजी सुरू आहे. सोशल मीडियावरची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. याच मुद्यावरून खासदारपुत्र प्रभाकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले.

या आरोपांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, ताजुद्दीन तांबोळी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी विश्वास पाटील म्हणाले, तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार सुमन पाटील यांनी मंजूर करून आणली आहेत. रोहित पाटील हेही सातत्याने अनेक कामांचा पाठपुरावा करीत असतात. त्यांच्याकडे वक्तृत्व तर आहेच पण त्याबरोबरच कर्तृत्व पण आहे. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व मतदारसंघ स्वीकारत आहे. त्यांचा वाढता प्रभाव पाहून विरोधकांच्या पाण्याखालील वाळू सरकली आहे.

कवठेमहांकाळमधील पाणी योजनेप्रमाणेच तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या निधीचे श्रेय घेण्यासाठी खासदारांची धडपड सुरू आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर सत्ता आल्यानंतर अवघ्या 4 दिवसात पाणी योजना मंजूर केल्याचे श्रेय खासदार घेऊ पाहत होते. पण अवघ्या 4 दिवसात प्लॅन, एस्टीमेट, मंजुरी या गोष्टी होत नाहीत. त्याठिकाणी त्यांचा श्रेय घेण्याचा प्लॅन फसला आहे. तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या निधीबाबतही खासदार गट श्रेय घेऊ पाहत आहे. धादांत खोटे बोलून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

वास्तविक संजय जमदाडे सभापती असताना पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या काळात या कामाला 14 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर झाला. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील सगळ्याच मंजूर कामांना स्थगिती दिली. ही स्थगिती उठवण्यासाठीही आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

पाटील पुढे म्हणाले, खासदार समर्थक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. मुळात आता जी स्थगिती उठवण्यात आली आहे ती आम्ही मंजूर केलेल्या कामावरील उठवण्यात आली आहे. त्यासाठी नवीन कुठलाही प्रस्ताव खासदारांनी दाखल केला नाही. 14 कोटी 91 लाखाच्या निधीत फर्निचर, क्वार्टरसह सर्व कामे होणार आहेत. शिवाय ही स्थगिती उठवण्यासाठी खासदारांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना दिलेले पत्र बोगस असल्याचा पर्दाफाश विश्वास पाटील यांनी केला. या पत्रावरील सही बोगस आहे. त्यांच्याही पत्रावर जावक क्रमांक नाही. शिवाय खासदारांच्या वेगवेगळ्या सह्या असणारी दोन पत्रे पत्रकार परिषदेत सादर करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.