प्रतिष्ठा न्यूज

नालसाब मुल्लाच्या खुन प्रकरणी तिघांना अटक ; अल्पवयीन मुलाचा सहभाग : खून पूर्ववैमनस्यातून

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व बाबा ग्रुपचा अध्यक्ष नालसाब मौला अली मुल्ला (वय ४८, रा. माने चौक, शंभरफुटी रस्ता ) याच्या खून प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सनी सुनिल कुरणे (वय २३, जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (वय २०, रा. लिंबेवाडी, ता. कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी तिघांची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. सांगलीतील एका खुनातील संशयिताला मोकामध्ये जामिन न होण्यासाठी मुल्ला प्रयत्न करत असल्यामुळे साथीदारांनी काटा काढला, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मृत नालसाब मुल्ला हा शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्या बाबा सप्लायर्स या ऑफीसच्या दारात बसला असता दोन दुचाकीवरून हल्लेखोर आले. तेव्हा दोघांनी मुल्ला याच्याजवळ येऊन पिस्तुलातून गोळ्या घातल्या. तसेच दोघांनी तलवारीने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर शिवीगाळ दमदाटी / करत, तलवार नाचवत आणि हवेत गोळीबार करत अंधारात पळून गेले. या खुनानंतर अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खुनामागे काय कारण आहे, याचा शोध घेऊन हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके पाठविली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे व सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना हा खून जयसिंगपूरच्या सनी कुरणे आणि साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. तसेच संशयित अंकली ते हरिपूर रस्त्यावर थांबल्याचे समजले. पथकाने तेथे जाऊन सनी, विशाल, स्वप्निल आणि अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मुल्ला याच्या खुनाची कबुली दिली.

खुनाचे कारण विचारता चौघांनी सांगितले की, सांगलीतील महेश नाईक या तरूणाच्या खुनप्रकरणी संशयित सचिन डोंगरे (रा. सांगली) हा मोकाच्या आरोपाखाली सध्या कारागृहात आहे. सचिनचा जामिन होऊ नये म्हणून मुल्ला हा प्रयत्न करीत होता. त्यामुळे सचिनच्या सांगण्यावरून मुल्ला याच्या खुनाचा कट रचून काटा काढला, असे चौघांनी सांगितले. अटक केलेल्या चौघांपैकी स्वप्निल मलमे याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह चार गुन्हे दाखल असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
नालसाब मुल्ला याच्या खुनाचा एका दिवसात छडा लावण्याच्या तपासात उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, सहायक दीपक गायकवाड, संदीप नलवडे, विनायक सुतार, विशाल कोळी, अरूण औताडे, आमसिद्ध खोत, अमोल लोहार आदींनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.