प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

शिक्षण आणि शेतीचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व हरपले : नारायण (तात्या)कृष्णा मोहिते यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रतिष्ठा न्यूज

तासगाव प्रतिनिधी/ दि. 22 : शिक्षण आणि शेतीचा ध्यास असलेले व्यक्तिमत्त्व स्वर्गीय नारायण (तात्या) कृष्णा मोहिते यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 78 व्या वर्षी दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेसात वाजता मांजर्डे येथे राहत्या घरी निधन झाले .आज उत्तरकार्य विधी व गोडाचा विधी संपन्न झाला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि शेतीचा विकास केला. खूप कमी वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पेलली होती .लहानपणापासूनच काबाडकष्ट त्यांच्या वाट्याला आले होते. पण जिद्द ,चिकाटी व कामासाठी झोकून देण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी त्यावर मात केली. आम्हा सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले .स्वावलंबी बनवले. ज्यांनी ज्यांनी सरस्वतीची आराधना केली आहे त्या त्या कुटुंबांचे पांग फिटल्याशिवाय राहत नाही असे ते नेहमी सांगायचे .हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या सर्व मुलांना त्यांनी उच्चशिक्षित केले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. पहिल्या पिढीतील ज्या ज्या कुटुंबातील लोकांचे शिक्षण झाले आहे त्यांची आजची स्थिती बघा असे ते वारंवार सांगायचे.चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणासाठी ते आग्रही असायचे. कितीही कष्ट पडोत पण आपल्या मुलाबाळांनी, नातवंडांनी खूप शिकावे असे त्यांना मनोमन वाटायचे. आज त्यांच्या प्रेरणेने आमच्या कुटुंबात शिक्षक, डॉक्टर, अभियंते होऊ शकले. उच्च पदावर पोहोचू शकले .कुटुंबाची स्थिती बदलायची असेल तर आजच्या परिस्थितीत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच ते आमच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट उपसत होते.
स्वर्गीय कृष्णा (अण्णा) दत्तू मोहिते आणि सावित्री यांच्या पाच अपत्यांपैकी ते एक होते. गरिबीने गांजलेल्या आणि अशिक्षित अज्ञानी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. पहिल्या दोघी सोनाबाई व शिलाबाई ; तात्या हे तिसरे आणि मारुती (अधिकराव) व अनुसया सर्वात धाकटी कन्या होती. लहानपणापासूनच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. ते नेहमी म्हणायचे,”मोटेचा नाडा उचलत नव्हता तेव्हापासून मी बैलक्या झालोय. बैले शिवळाला जुंपायला माझा हातही पोहोचत नव्हता.”अतिशय प्रतिकूल परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यात शेतीही अत्यल्प असल्यामुळे अनेकांची शेती ते वाट्याने करायला घ्यायचे. कुटुंबातील सर्वच जण रानात राबायचे. बहिणी लग्नानंतर सासरी गेल्या.आणि कामाचा भार त्यांच्यावर पडला .धाकटे अधिकराव यांनाही मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दिले.शेतीच्या कामात तात्या अगदी परिपूर्ण होते.शेतात भरपूर धान्य पिकवायचे. ऊस ,हळद,मिरची,ज्वारी, सोयाबीन, द्राक्ष ,आंबा अशी पिके ते घेत असत. एक जाणकार शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती. एक साल ही त्यांनी शेती तोट्यात जाऊ दिली नाही. हे आम्ही पाहिले आहे. शेती कशी फायद्यात असते हे त्यांनी दाखवून दिले. एकही वर्ष त्यांची द्राक्षबाग फेल गेली नाही. दर शनिवारी, रविवारी, सुट्टीच्या दिवशी ते आम्हाला भावंडांना शेताच्या कामावर मदतीला न्यायचे.कोणती कामे कशी करायची याची माहिती सांगायचे. आमच्याकडून करून घ्यायचे. मुलांना कष्टाच्या कामाची सवय असावी असा त्यांचा दंडक होता. काम चुकवून आम्हाला कधी त्यांनी पळू दिले नाही. आम्हा भावंडांना त्यांची जबरी भीती वाटायची.
‘ छब्या-सावळ्या’ ही बैलजोडी  त्यांच्याकडे खूप वर्षे होती. त्या बैलजोडीवर त्यांनी जिवापाड प्रेम केले.त्यांच्यासोबत त्यांनी फोटो पण काढले होते. आज त्या स्मृती जागवल्या की डोळ्यात अश्रू येतात. स्वर्गीय विठ्ठल शिंदे ,स्वर्गीय तुका बापू, स्वर्गीय हणमा काळे, स्वर्गीय सोपान काळे तसेच श्री.सुरेश सुतार, अण्णा सुतार,तानाजी काळे,विलास खंडू, विष्णू खराडे,सूर्यवंशी बंधू, प्रकाश पाटील ( बलगवडे ),बाळू पाटील,विष्णू बंडू मोहिते,स्वर्गीय तातोबा मोहिते, विलास (अण्णा) मोहिते  यांच्यासोबत त्यांची मैत्री होती. एकमेकांच्या संगतीने,सोबतीने त्यांनी कामे केली.शेतीचा वाटा केला. नांगरणी ,पेरणी, कुळवणी, कोळपणी अशी कित्येक कामे केली.८ बैले,१० बैले यांची नांगरणी करतानाचे दृश्य आजही डोळ्यांसमोर तसेच येते.आम्ही त्यांचे दुपारचे जेवण घेऊन जात असे.ते सहकाऱ्यांशी खूप खेळीमेळीने असायचे.कामात असताना कधी ताण नाही,तणाव नाही पण काम पूर्ण करण्याची त्यांची घाई असे. लगेच पूर्ण करून दुसरं काम हाती घ्यायचे. तात्यांनी रात्रंदिन कष्ट उपसले.
विजार,शर्ट,टोपी असा त्यांचा साधा पोशाख होता.शेतकऱ्याला आणि त्यांच्या व्यवसायाला शोभणारा ,नटण्यामुरडण्याची किंवा नवनवीन कपडे घालण्याची त्यांनी कधीच हौसमोज केली नाही. शेतावर, रानात राबताना मळलेलीच कपडे त्यांच्या अंगावर असायची. मळकट कपड्याचे त्यांनी कधीच मनाला लावून घेतले नाही. आम्हाला मात्र ते आवडायचे नाही. आम्ही इतरांसमोर मळकट कपडे पाहून खजील व्हायचो.
ते खूप ताकदवान होते.त्यांचा आहारही त्याच पद्धतीचा असायचा. वैरणीचा एक भारा आणला की गोट्यातील सर्व जनावरे दिवसभर वैरण खायचे.जनावरांवर , पशुपक्ष्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते.बैल,गाय, म्हैशी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळायचे.गेंड्यासारख्या गुटगुटीत म्हैशी ते सांभाळायचे.घरामध्ये साहजिकच त्यामुळे दुधदुभत्याची लयलूट असायची. त्याचप्रमाणे फळे, भाजीपाला ते आपल्या रानातच पिकवायचे.आपल्या स्वतःच्या रानात,शेतीत नि स्वतः पिकवलेल्या नि विनारासायनिक पदार्थांशिवाय वाढविलेल्या फळभाज्या यांवर त्यांचा विश्वास होता.कंपोस्ट खत वापरण्याचे ते पुरस्कर्ते होते.तर रासायनिक खत पिकांना वापरण्यास त्यांचा विरोध असायचा.सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांचे ते सतत समर्थन करायचे आणि प्रयोगही करायचे. कोणत्याही रोपांची ते कलम स्वतः करत.त्याच्या वाढीचे निरीक्षण करत. रोपांची जपणूक करत .आंबा, द्राक्षे यासाठी सेंद्रिय खतांचा ते नेहमीच वापर करत.
तात्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असायचे.ते बोलताना स्मित हास्य करूनच बोलायचे असे आज अनेक जण स्मृती जागवताना सांगतात. पण हा गुण आम्हाला खूप कमी दिसायचा. आमच्यासोबत ते नेहमी रागीट,करारी, कडक, शिस्तबद्ध होते. आमच्याशी ते नेहमी गंभीरपणे बोलायचे. त्यांचं बोलणं हे पक्क असायचं;ठाम असायचं.ते जे बोलायचे तसे करायचे. ते परिणामाचा फारसा विचार कधी करत बसायचे नाहीत. वाईट परिणामाचे कृत्य कधी केले नाही. त्यामुळेच ते पक्के बोलत.”कष्टाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही; ते मिळतेच “यावर त्यांचा विश्वास होता. तात्या अतिशय धाडसी स्वभावाचे होते. त्यांना रात्रीची,अंधाराची किंवा  एकटेपणाची कधीही भीती वाटली नाही.रात्र रात्रभर एकटेच ते ऊसाला पाणी पाजायला जायचे.लहानपणी आठआणे मजुरीसाठी त्यांनी बलगवड्याच्या पाटलाच्या उसाला रात्रभर पाणी पाजले आहे.आणखी एक आठवण नेहमी सांगायचे,”आम्ही इतकी गरिबी सोसली आहे की सणासुदीला कधीही आम्हाला गोडधोड खायला मिळाले नाही. दिवाळीच्या सणाला आम्ही भावंडांनी भेंडी-भाकरी खाल्ली आहे.” पण आता…. सध्याचा त्यांच्या कष्टाने, नशिबाने दिवस बदलले होते. घरातील तुळीला टेकलेल्या धान्याच्या पोत्यांची रास,थप्पी आजआमच्या नजरेसमोरून जात नाही.१००/१५० पोती धान्य पिकवायचे आणि त्यातील ३०/४० पोती धान्य वाटून यायचे,असेच कडधान्याचेही असायचे,असे जनावरांचे. तात्या हे आमच्या दृष्टीने  विलक्षण व्यक्तिमत्व होतं. एक खूप चांगली ‘कामधेनू’ आमच्या तात्यांनी गोठ्यात आणली होती. होय कामधेनूच ती……!साधारणपणे १९८५ ते२००० या पंधरा वर्षात तिनेच  आमचे कुटुंब तारले. एका गायीमुळे आम्हा मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाचा गाडा तिने हाकला होता. तिच्या येण्याने हा गाडा अनेक वर्ष सुसाट धावत राहिला. तिच्या स्मृती न येणे म्हणजे नवलच….!आम्हा भावंडांना त्यामुळे ‘पशुधन’ काय असतं याची खात्री पटली होती. धारापाणी,खाद्य, स्वच्छता,गोठा याची खडान खडा माहिती झाली होती. आमच्या कुटुंबाचे शिक्षण, आरोग्य,पाहुणेरावळे,सण, समारंभ,बहिणींची लग्नं, कार्यक्रम इत्यादी या सगळ्या सगळ्याला या कामधेनुने गाईने पुढे हाकले होते.आमचे तात्या पूर्ण अस्तिक होते,पण खरं सांगतो ते कधीही मंदिरात जाऊन बसले नाहीत किंवा प्रार्थनेसाठी याचिकासारखे त्यांनी देवालाही कधी हात जोडले नाहीत किंवा देवा-यात कधी मूर्ती पूजेसाठी बसले नाहीत. ते आपल्या कामालाच सतत देव मानत राहिले.आणि कामातच देव शोधत राहिले. ज्येष्ठ साहित्यिक ग.दि.मा.यम्हणायचे तसे .                  “नसे राउळी वा नसे मंदिरी,
जिथे राबती हात…..
अहो,, तिथे नांदतो हरी ||”
“”रामकृष्ण हरी””!!मात्र ते बसता-उठता-झोपता म्हणत असायचे. कधी कधी ते  छब्या- सावळ्याला गाणे म्हटल्याचे मी कित्येकदा ऐकले आहे. फाटक्या परिस्थितीचा आणि कामाचा ताण मात्र त्यांच्या मनावर असायचा. त्यामुळे ते आम्हाला सतत रागातच बोलायचे.आम्हालाही त्याची सवय झाली होती.                                   आमचे तात्या खरंच उदयोन्मुख विचारांचे होते. माणसांबद्दल,माणुसकीबद्दल त्यांना प्रचंड जाण होती. ते अल्पशिक्षित जरूर होते. पण आंतरिक शहाणपण त्यांच्याकडे होते. सकारात्मकता हा त्यांचा स्थायीभाव होता. प्रामाणिक धारणा,शुद्ध हेतू,काम पूर्णत्वाकडे नेणारी त्यांची कृती अफलातून होती. हे आम्ही पाहिले आणि अनुभवले देखील आहे.तात्या खरंच आधुनिक विचारांचे पायीक होते. पूर्वी पायी चालत जायचे, नंतरच्या काळात बैलगाडी त्यांनी सांभाळली, नंतर शेती केली.त्यानंतर त्यांनी दोन चाकी सायकल चालवली,त्यानंतर दुचाकी गाडी घेतली.त्यावरून ते ये-जा करायचे.  वयाच्या ६५ व्या वर्षी ते टू- व्हीलर गाडी शिकले.आणि शेवटच्या टप्प्यात जेव्हा ते कार मध्ये रुबाबाने पुढील सीटवर बसायचे तेव्हा आम्हाला खरंच त्यांचा अभिमान वाटायचा. अभिमानाने ऊर भरून यायचा.  आपल्या नातवाच्या प्रेमविवाहाला सगळ्यात पहिल्यांदा होकार,मान्यता देणारे तात्या पाहिले की आजवर आम्हाला हा माणूस कसा काय अजून समजला नाही? याचे अप्रूप वाटायचे. ते अतिशय धूर्त,धोरणी आणि नियोजनबद्ध कामाची आखणी करायचे.आणि हिंमतीने ते पारही पाडायचे. आणि आपल्या कृतीवर ठाम असायचे.विचारांपासून ते कधीही चलबिचल झाले नाहीत .आज वयाच्या५० व्या वर्षीही आम्हाला या गोष्टी जमत नाहीत. किंवा जमतील असेही वाटत नाही. यावरूनच त्यांच्या विचारात विशालता होती हे लक्षात येते.हाव, लोभ, हावरेपणा, द्वेष या दुष्ट विचारांनी त्यांना कधीही स्पर्श केला नाही. “प्रामाणिकपणा, शुद्ध हेतू, कष्टाने मिळेल ते खाऊ नाही तर उपाशी झोपू” हा त्यांचा उच्च कोटीचा स्वाभिमान त्यांच्या रक्तातच होता. कधीही त्यांनी पूर्ण आयुष्यात कोणाची कशासाठी लांडीलबाडी केली नाही. आयुष्यभर ते खरेपणाने वागले .आणि जगलेदेखील. आम्हा मुलांवर,नातवंडांवर, लेकीसुनांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले. नातू,पंतू यांचे मुखकमल पाहण्याचे भाग्यही त्यांना मिळालं होतं. आयुष्याच्या उत्तरार्धात अतिशय सुखासमाधानाने, आनंदाने ते जगले. आम्हा मुलां- नातवंडांच्या प्रगतीबद्दल ते कायम खुश असायचे, समाधानी असायचे, पण कोणत्याही आनंदाने,प्रगतीने ते कधीच हुरळून गेले नाहीत. त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले.मातीशी आपलं नातं, इमान त्यांनी घट्ट राखलं. आता विलीन झाल्यानंतरही ते मातीशीच एकरूप होऊन विरून गेले. त्यांच्या बाबतीत मला एस.एस.पाटील या कवीच्या ओळी नेहमी सार्थ वाटायच्या.जणू तात्यांसाठीच त्यांनी लिहिल्या काय असे वाटायचे ;                     “”सुखात हसणे जमले नाही…….  दुःखात रडणे जमले नाही ……
खरे बोलण्याची सवय मला……
बरे बोलणे जमलेच नाही…….””
हृदयापासून ते देवाचे आभार मानायचे आणि म्हणायचे ”मला माझ्या प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाले आहे.आता माझी कशातही आशा राहिली नाही. मी अतिशय समाधानी आहे .माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मी अल्पशिक्षित मला काय कळतय  पण माझी मुलं-मुली शिक्षक आहेत. माझी नातवंड डॉक्टर, इंजिनियर आहेत. लेकी, सुना,जावई यांनी माझं घर भरले आहे.जावई चांगल्या हुद्द्यावर आहेत .आता आणखी काय हवंय मला. माझं घर म्हणजे गोकुळ आहे.” आम्ही सर्वजणांनी खरच त्यांची अनुभूती घेतली. पण तात्या तुम्ही या गोकुळात अजूनही आम्हाला हवे होता… सगळं काय असूनही आता सारं सुनंसुनं वाटतय हो……..   तात्या तुमच्या पितृ छायेखाली आम्ही किती सुखाने जगलो; वाढलो. आता तुमची क्षणाक्षणाला आठवण येत राहील…
“”तुमच्या पवित्र स्मृतीनेही आमच्या घामाची फुलं होतील॥””                         तात्या तुम्ही सगळ्यांशी आपलेपणाने वागला..बोलला सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून राहिला. भाऊबंदकी, शेजारीपाजारी, पै-पाहुणे या सगळ्यांशी तुम्ही किती सहजतेने समजून घेतले. मोठ्यांशी विनम्रतेने राहिलात. आणि लहानांना सुद्धा आदराने वागाविलात. सगळं कसं जमलं हो तुम्हाला,….. खरंच मला जमेल का हो??? आईशी तुम्ही प्रेमाचे चार शब्द बोलला नाही.पण तुमच्या प्रत्येक शब्दात तिच्याबद्दलची काळजी, प्रेम आम्हाला जाणवत होते.तिच्या उर्वरित आयुष्यासाठी कदाचित तेच उपयुक्त असेल. पूर्ण आयुष्यात कधीही तुम्ही एकमेकांना सोडून एक दिवसही राहीला नाही. तात्या तुमचा आईवर खूप जीव होता पण तो तुम्हाला फक्त शब्दात व्यक्त करता आलं नाही हे आम्ही समजून घेतलय ;जाणून घेतलय.खरंच तात्या तुमचे आचार विचार, स्वभाव अतिशय निर्मळ असा होता. तोच आचार विचार तुमचे संस्कार,स्वभाव वैशिष्ट्ये, अपार कष्टप्रदतता आम्ही जपण्याचा आणि अंगीकार करण्याचा आणि तुमचे विशाल  विचार स्व:तात रुजविण्याचा आम्ही तहयात प्रयत्न करू.                  “”तुम्हीच आमचे देव देवता…. माता     पिता …..।
म्हणून पूजीतो तुम्हा आता  या जन्माच्या भगवंता ……||””
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धडपडणारा एक बाप मी पाहिला आहे………. सह्याद्रीचा कडा कष्टाने फोडणारा कणखर  दुर्धर बाप मी पाहिला आहे ………    लेकी सासरला जाताना आतून तिळतिळ तुटणारा बाप मी पाहिला आहे……… आकाशाला गवसणी घालणारे स्वप्न कसे पहावे आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी झोकून कष्टाळणारा एक धगधगता झंजावात बाप मी पाहिला आहे …………………..परिस्थितीच्या काळ्याकुट्ट अंधारात फक्त हाताच्या कष्टावर विश्वास ठेवून चालणारा एक स्थितप्रज्ञ वाटसरू बाप मी पाहिला आहे ………………………..मृत्यूलाही न घाबरणारा कणखर अवलिया बाप मी पाहिला आहे………… ….. मृत्यू समोर दिसताना तो हासत हासत स्वीकारणारा एक आनंदयात्री बाप मी पाहिला आहे ………………….पण तात्या मला तुमच्या सारखे नक्कीच जमणार नाही म्हणून मी वाट सोडून पळणार नाही; त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीन.. तुमच्या वाटेवरून चालण्याचा, तुमच्या विचारातील मला समजलेली आर्त विशालता पकडून ठेवण्याचा प्रयत्न करीन… आयुष्यभर तुमच्या कष्टाच्या घामाची फुले करण्याचा संकल्प मी मनोमन करत राहीन…….. तहयात…….
माझ्या आयुष्याच्या अर्धशतकी वाटचालीत तात्या तुमचा सहवास म्हणजे एका देवदूताची साथ मला मिळाली. मी ती अनुभवली असे मी मनोमन मानतो. ही साथ सहवास माझ्या तहयातीत विस्मृतीत जाणार नाही.याची मला खात्री आहे. म्हणून म्हणतो …………………….  “”जन्मोजन्मी पून्हा पुन्हा व्हाव्या आपुल्याच भेटी…. |.                              पुन्हा एकदा जनम घ्यावा तात्या तुमच्या पोटी….. तात्या तुमच्या पोटी ……..।।””
शब्दांकन (तात्यांचे चिरंजीव)
*रमेश नारायण मोहिते*
मुख्याध्यापक नूतन मराठी विद्यामंदिर तासगाव

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.