प्रतिष्ठा न्यूज

क्षत्रिय मराठा असलो तरी कुणबी म्हणजे शेतकरी आहोत म्हणून कुणबीपणाची लाज बाळगू नका : मनोज जरांगे पाटील; आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही; सांगलीत आली मराठा त्सूनामी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : काही मराठ्यांना कुणबी म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. मराठा क्षत्रीय असलो तरी आपण जगाचे पोषण करणारे कुणबी आहोत म्हणून कुणबी म्हणून घेण्याची लाज बाळगू नका, आपल्या लेकराबाळांसाठी एकीने लढा द्या, असे आवाहन करत मराठा आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. २४ डिसेंबर नंतर आरक्षण मिळाले नाही तर आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल. ते सरकारला परवडणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी सांगली येथील सभेत दिला.
येथील तरूण भारत स्टेडियमवर हजारो मराठा बंधू भगिनींच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा आज शुक्रवारी दुपारी पार पडली. सांगली शहर परिसरातून हजारो मराठा बांधव या सभेला उपस्थित होते. आज सांगली जिल्ह्यात विटा, सांगली आणि ईश्वरपूर या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या तीन सभा होत्या. विटा येथील प्रचंड सभा आटोपून ते सांगलीकडे रवाना झाले. रस्त्यात ठिकठिकाणी हार तुरे फुलांची उधळण करीत विविध गावांमध्ये त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. सांगली येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास मनोज जरांगे पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तरूण भारत स्टेडीयमवरती आगमन होताच जनसमुदाय तसेच महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, अनेक मोठ मोठ मंत्री माझ्या आंदोलनाच्या ठिकाणी आले. मला विकत घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी विकलो गेलोे नाही. काही मंत्री बाजूला घेऊन चर्चा करूया म्हणत होते. परंतु मी बाजूला गेलो नाही. जी काही चर्चा होईल ती समाजासमोरच होईल अशी स्पष्ट भूमिका घेतली. मी समाजासाठी आयुष्य अर्पण केले आहे. मराठा समाजासाठी लढताना जीव गेला तरी बेहत्तर. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या होत्या परंतु त्यांना पुरावे सापडत नव्हते. आता पुरावे सापडू लागले आहेत. सन २००४ सालच्या निर्णयात बदल करून घेऊन आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचा योग्य प्रयत्न झाला नाही. कुणबी असल्याचे दाखले आता दिले जात आहेत. २४ डिसेंबर २०२३ पर्यंत सरकारने मुदत मागितली आहे. तोपर्यंत जर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला नाही तर आपण शिवरायांचे मावळे आहोत. पुढची लढाई ही निकराची असेल. ती सरकारला परवडणारी नसेल. नेमकी दिशा समाजाशी चर्चा करून ठरविली जाईल. ते आताच जाहिर केले जाणार नाही. आरक्षण ही आपल्या लेकरा बाळांच्या भवितव्याची लढाई आहे. ती जो पर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबायचे नाही.
कुणबी म्हणजे शेतकरी
काही मराठ्यांनी कुणबी या शब्दाला विरोध दर्शविला आहे. यावर बोलताना मनोज जरांगे पाटीलर म्हणाले, कुणबी म्हणजे जात नाही तर आपण शेतकरी असल्याचा तो पुरावा आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. आपण क्षत्रिय मराठे असलो तरी जगाला पोसणारे शेतकरी आहोत. ज्यांना शेतकरी असल्याचा अभिमान नाही. ज्यांना कुणबी म्हणून घेण्याची लाज वाटते त्यांनी आपली शेती विकून चंद्रावर जावे. चारी बाजूंनी मराठ्यांना घेरले आहे. मराठा ही जात संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाने एकसंघपणे लढा दिला पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.