प्रतिष्ठा न्यूज

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून पर्यावरण व निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी – मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा पासिंग आऊट व दिक्षांत समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : वनपरिक्षेत्र अधिकारी हे वन विभागाचा कणा आहेत. नवोदित अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत सक्षमपणे व प्रमाणिकपणे करून पर्यावरण व  निसर्गाची उत्तम प्रकारे सेवा करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य, पुणे चे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण, यांनी व्यक्त केली.
कुंडल वन प्रबोधिनी येथे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम, कुंडल वन प्रबोधिनी चे  महासंचालक जे.पी.त्रिपाठी, कांदळवन मुंबई चे उपवनसंरक्षक डॉ. शैलेद्रकुमार जाधव, उपवनसंरक्षक सांगली नीता कट्टे, प्रबोधिनीचे संचालक व सत्र संचालक भरत बाबूराव शिंदे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे आदी उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रवीण यांनी काम करत असताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या. तसेच केलेल्या कामाची नियमितपणे नोंद ठेवावी, नियमित दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवावी, असे केल्यास बदलत्या काळातील वन संरक्षण व संवर्धनाची आव्हाने सहज पेलता येतील असे त्यांनी सांगितले.
मुख्य वनसंरक्षक (प्रा.), कोल्हापूर आर. एम. रामानुजम म्हणाले, अधिकारी म्हणून काम करताना अनेक अडचणी व आव्हानांचा सामना करावा लागेल. तक्रारी करत न बसता अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या वन परिक्षेत्रात काम करताना प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन तसेच अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांना उत्तम प्रकारे काम करण्यासाठी प्रेरित करावे. अतिक्रमणांपासून वनांच्या संरक्षणासाठी वन कर्मचारी यांची टीम करून त्यांच्या समवेत वन भ्रमंती करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी यांनी आपल्या भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या अधिनस्थ  संचालक, वन शिक्षण, डेहराडून यांच्याकडून आयोजित करण्यात येत असलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी पदासाठीच्या या प्रशिक्षणाबाबत तसेच प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली. ही प्रबोधिनी देशातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. वनक्षेत्रपाल यांचा हरित योद्धे (Green Warriors) असा उल्लेख करून, वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण, विविध परिसंस्था व अधिवासांचे संरक्षण करून वसुंधरेचे रक्षण करण्याची जबाबदारी वनक्षेत्रपाल यांच्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रबोधिनीचे संचालक व या बॅचचे सत्र संचालक भरत शिंदे यांनी निकाल जाहीर केला. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व मानचिन्हांचे वितरण करण्यात आले.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या तुकडीमध्ये केरळ राज्यातील 33, पश्चिम बंगाल 6 व जम्मू काश्मीर 3 अशा एकूण 42 प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पश्चिम बंगाल मधील प्रशिक्षणार्थी नितीशकुमार महातो हे 83.88 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
भारत सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे कुंडल वन प्रबोधिनी येथे दि. १९ डिसेंबर २०२२ ते १८ जून २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ महिने कालावधीच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा दहाव्या प्रशिक्षण सत्राचा दिक्षांत समारंभ आज संपन्न झाला. तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडचे संचलन प्रबोधिनीच्या मैदानावर झाले. त्यानंतर या अधिकाऱ्यांचा स्टार ओपनिंग समारंभ संपन्न झाला.
प्रातिनिधिक स्वरुपात केरळचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी टि. के. श्रीनाथ, पश्चिम बंगालची वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी रोनिता दास व जम्मू काश्मीरचे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी सुमित कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘अरण्य’ (ARANYA Memoir) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.   सूत्रसंचालन निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी, यांनी केले तर आभार संचालक भरत शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास निवृत्त उपवनसंरक्षक एम. एस. भोसले, निवृत्त सहायक वनसंरक्षक रामदास पुजारी व वनविभागाचे इतर अधिकारी तसेच केरळ, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मीर या राज्यांतून मोठ्या संख्येने आलेले प्रशिक्षणार्थी, अधिकाऱ्यांचे पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.