प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी : २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळाला

प्रतिष्ठा न्यूज
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांचा पराभव केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना सुमारे १,००० मते मिळाली असून ४१६ मते बाद ठरली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९६ टक्के मतदान झाले होते. आज मंगळवारी (दि.१९) मतमोजणी झाली. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा राहिला असल्याचे समजते. काँग्रेसच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे त्यांचा विजय या निवडणुकीत निश्चित होता.

९,९०० पैकी ९,४०० वर प्रदेश काँग्रेससमिती प्रतिनिधींनी गुप्तमतदानाद्वारे पक्षप्रमुख निवडीसाठी आपापला कौल दिला होता. पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रा शिबिरात संगनाकल्लू येथे उभारलेल्या बूथवर रांगेत उभे राहून मतदान केले होते. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियांका गांधी-वधेरा यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात मतदान केले होते. महाराष्ट्रातून ५६१ पैकी ५४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

*काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीचा इतिहास*
१९३९ मध्ये जेव्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली, तेव्हा महात्मा गांधींच्या गटाचे उमेदवार पी. सीतारामैय्या हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून पराभूत झाले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. तेव्हा पुरुषोत्तम दास टंडन आणि आचार्य कृपलानी यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या टंडन यांनी कृपलानी यांचा पराभव केला होता.

१९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर देव कांत बरूआ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ब्रह्मानंद रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सिद्धार्थ शंकर आणि करण सिंह यांचा पराभव केला होता.

सोनिया गांधी सर्वाधिक काळ राहिल्या काँग्रेस अध्यक्षपदी
पुढे २० वर्षानंतर म्हणजे १९९७ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सीताराम केसरी हे शरद पवार आणि राजेश पायलट यांचा पराभव करून अध्यक्ष झाले होते. सीताराम केसरी यांना ६,२२४ मतं मिळाली होती, तर शरद पवार यांना ८८२ आणि पायलट यांना ३५४ मतं मिळाली होती.

२००० मध्ये जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा गांधी कुटुंबातल्या व्यक्तीला आव्हान दिलं गेलं होतं. या निवडणुकीत सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद अशी लढत झाली होती. सोनिया गांधी यांना ७,४०० मतं मिळाली होती. तर प्रसाद यांना ९४ मतं मिळाली होती.

सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदी सर्वाधिक काळ राहिलेल्या व्यक्ती आहेत. त्या १९९८ पासून काँग्रेस अध्यक्षपदावर आहेत. मध्ये २०१७ आणि २०१९ मध्ये राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्ष पद सांभाळलं होतं.

सांगलीत कार्यकर्त्यांनी केली साखर वाटप

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.