प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी आळंदी येथील भव्य १६ व्या वारकरी महाअधिवेशनात वारकर्‍यांची एकमुखी मागणी

प्रतिष्ठा न्यूज
पुणे प्रतिनिधी : मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या लव्ह जिहादाला बळी पडणार नाहीत. स्वतःची मुले काय करतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षण व्यवस्था मोडून मॅकोले शिक्षण व्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे प्रतिपादन पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी आळंदी जिल्हा पुणे येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केले.
आळंदी येथे २१ नोव्हेंबर या दिवशी येथील श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य राज्यव्यापी सोळावे वारकरी महाअधिवेशन’ उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला सहस्रों वारकर्‍यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा,गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी अशी वारकऱ्यांनी एकमुखी मागणी केली.
या अधिवेशनात संमत करण्यात आलेले महत्वपूर्ण ठराव …

सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत, बियरबार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत, महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी, हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा, यांसह १६ ठराव संमत करण्यात आले.महाअधिवेशनात झालेल्या ठरावांचे निवेदन तयार करून वारकर्‍यांच्या वतीने ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. मारुती महाराज तुनतूने शास्त्री ह. भ. प. भगवान महाराज कोकरे इत्यादी अनेक वारकरी वक्त्यांनी हिंदू धर्मातील विटंबना बाबत वारकरी अधिवेशनात आपले विचार प्रस्तुत केले. मिलिंद एकबोटे आणि विजय वरुडकर यांचेही मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, शासनाने सर्वच गडदुर्गांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हटवले पाहिजे. सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून हलाल जिहाद आणि उत्पादने ही देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे, तसेच लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, वक्फ बोर्ड कायदा, धर्मांतर असे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखायला हवेत. हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होऊन प्रयत्न करावेत.
या वेळी अधिवेशनात कृतीशील असणार्‍या राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या नगर जिल्ह्यातील सदस्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ह भ प निरंजन शास्त्री कोठेकर महाराज आळंदी अध्यक्ष देविदास धर्मशाळा यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय वारकरी परिषदेची उत्कृष्ट कृतीशील जिल्हा समिती म्हणून नगर जिल्ह्याचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ह.भ.प. अरुणमहाराज पिंपळे आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. अधिवेशनाची सांगता पसायदानाने झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.