प्रतिष्ठा न्यूज

मंकी पॉक्स सदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

आजाराचा प्रसार होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करा

प्रतिष्ठा न्यूज 

सांगली दि. 1 (प्रतिनिधी) : मंकी पॉक्स या आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे कोविड-19, मंकी पॉक्स व स्वाईन फ्ल्यू या आजारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. त्याचबरोबर उपजिल्हा रूग्णालय इस्लामपूर व उपजिल्हा रूग्णालय कवठेमहांकाळ येथे ही स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशा सूचना देवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सर्वांनी नियमाचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्स सदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करावे, तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होवू नये यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात मंकी मॉक्स, कोविड-19 व स्वाईन फ्ल्यू तसेच इतर सांसर्गिक आजारांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने तसेच जिल्हास्तरीय व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, कोरोना या जागतिक महामारीनंतर जगावर मंकी पॉक्स या नविन आजाराचे संकट आले आहे. या नव्या आजाराने सर्वसामान्यात दशहत निर्माण केली आहे. सध्या केरळ मध्ये मंकी पॉक्स आजाराचे तीन रूग्ण व दिल्ली मध्ये एक रूग्ण असे एकूण 4 रूग्ण देशात आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मंकी पॉक्सचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तथापि आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे.

            मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रूग्ण कांगो येथे आढळला. हा आजार ऑर्थोपॉक्स व्हायरस या डी.एन.ए. प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. तथापि लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रूग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या अजाराचा मृत्यूदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समुदायामध्ये मंकी पॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

            या विषाणूचा 6 ते 13 दिवस तथापी हा कालावधी 5 ते 21 दिवसापर्यंत अधिशयन कालावधी असू शकतो. ताप, डोके दुखी, अंग दुखी, लसिका ग्रंथीना सूज, प्रचंड थकवा, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला, शरीरावर अचानक रॅश / पूरळ उठणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

            मंकी पॉक्सचा प्रसार – माणसापासून माणसास – (१) थेट शरिरीक संपर्क – शरीर द्रव, लैंगीक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव (२) अप्रत्यक्ष संपर्क बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत (३) जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे.  प्राण्यापासून माणसास – बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्यांचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

            मंकी पॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी – मंकी पॉक्स टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. संशयित मंकी पॉक्स रूग्णास वेळीच विलग करणे, रूग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरूण पांघरूणाशी संपर्क येवू न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे. निश्चित निदान – प्रयोगशाळेत पीसीआर चाचणी अथवा सिक्वेन्सिंग व्दारे ज्याचे निदान झाले आहे असा रूग्ण.

            रूग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण – मंकीपॉक्स रूग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. रूग्णाने ट्रिपल लेयर मास्क लावणे आवश्यक आहे. रूग्णाच्या कातडीवरील पुरळ / फोड नीट झाकले जावेत यासाठी त्यांने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पँन्ट वापराव्यात. जो पर्यंत रूग्णाच्या कातडीवरील पुरळ पूर्णपणे बरे होत नाहीत तो पर्यंत त्याला विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.