प्रतिष्ठा न्यूज

माजी राज्यमंत्री समाज नायक मधुकरराव कांबळे यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्रातील शोषित वंचित समाज शोकसागरात बुडाला

मी कोण आहे..? मी माझ्या आयुष्यात काय करायला हवं..? आयुष्याचा अर्थ काय..? हे प्रश्न अनादी अनंत काळापासून, प्राचीन – सनातन काळापासून माणसं विचारत आली आहेत. आणि प्रत्येक पिढीला या प्रश्नांची नवी उत्तरं हवी असतात. ज्यांना अपेक्षित उत्तरं सापडतात, ती अचूक दिशेने आणि विचाराने परिपूर्ण होत जातात. मा.ना.श्री. मधुकरराव कांबळे हे स्व:मताचे, स्वतंत्र विचारांनी परिपूर्ण असलेले नेते होते. ज्यांना स्वतःची मते आहेत, स्वतःची आयडॉलॉजी आहे, स्वतःचा दृष्टिकोन आहे अशीच माणसं काळाच्या कसोटीवर टिकून राहतात. उठून दिसतात. शोभतात.
1975 साली भारतीय समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रचंड संक्रमण होत असताना, आकस्मिक बदल होत असताना एक तरुण स्वतः व स्वतःच्या उपेक्षित समाजाला नवी दिशा नवी, ऊर्जा देण्याच्या प्रयत्नात होता. स्वतःच्या मातंग वस्तीला ‘लहुजी नगर’ असे नामकरण करून आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक सुदृढतेचे वारसदार आहोत; हे मा. मधुकरराव कांबळे यांनी सिद्ध केले.
अनिष्ट रूढी परंपरा, 18 विश्व दारिद्र्य, अंधश्रद्धा यामध्ये दबलेला पिचलेल्या व्यवस्थेने अस्पृश्य समजलेल्या समाजाच्या व्यथा शासन दरबारी समर्थपणे मांडल्या. अन्यायाविरुद्ध विद्रोही आवाज दिला. खाजगी सावकारीविरुद्धचा लढा, अस्पृश्यता निवारण कार्यक्रम, मंदिर प्रवेशासाठी घेतलेल्या सामाजिक न्याय हक्क परिषदा, सामाजिक जाणिवेतून केलेले जनजागृती मिळावे, अन्यायाविरुद्ध उभा केलेली आंदोलनं यामुळे त्यांच्या कर्तुत्वाचा बहर चढतच होता.
साधारण 1989 साली ‘लहूशक्तीची’ स्थापना करून सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले. सामाजिक न्याय आणि समतेसाठी 1977 सालापासून सक्रिय राजकारणाचा प्रवास सुरू झाला होताच. 1993 साली महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना देखील मातंग समाजाचे आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार विरोधात मोर्चा काढणारा लढवय्या’ नेता होता. त्याचबरोबर 1997 साली ‘मातंग आरक्षण व इतर महत्त्वाचे सामाजिक प्रश्न’ घेऊन हिंदू (दलितांची अस्मिता जागृत करण्यासाठी जगप्रसिद्ध काळाराम मंदिर ते शिवतीर्थ मुंबई अशी एकूण 47 दिवसांची ‘अस्मिता यात्रा’ काढली.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे चिरागनगर घाटकोपर मुंबई येथील राहतं घर गहाण पडले होते. अनेक दिवस-महिने त्याचा अविरत पाठपुरावा करून घरमालकाचा शोध घेतला. घरमालकाला ‘अण्णाभाऊं’च्या पवित्र वास्तूचे महत्त्व पटवून दिले. सन1996 ते 2003 या प्रदीर्घ कालावधीनंतर उपेक्षितांची अस्मिता, समतेची प्रेरणा असलेले अण्णाभाऊंचे घर पुन्हा विकत घेण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले. तितक्याच निर्मळ अंतकरणाने मा. मधुकरराव कांबळे यांनी समाजाला अर्पण केले.
सन 2013 ते 2017 पर्यंत विविध सामाजिक प्रश्न तथा अनुसूचित जाती मधील आरक्षण वर्गीकरण लढ्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली येथे अनुसूचित जातीमधील उपेक्षित दलित नेत्यांची मोट बांधून लढा उभा केला. सामाजिक समता आणि न्यायाच्या लढ्यातील भारतभरातील अनेक दिग्गज नेते विचारवंत यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्तरावर, पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्र, नवी दिल्ली येथे आरक्षण वर्गीकरणाच्या बैठकीचे यशस्वी आयोजन केले.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर घाटकोपर मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन स्मारकाचे महत्व पटवून दिले. समतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा सुरू असलेला अविरत लढा साक्षीस ठेवून आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांची लेखणी नजरेसमोर ठेवून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसह स्मारक समिती गठीत केली. मा.ना. मधुकरराव कांबळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन या लोकनेत्याचा सन्मान वाढविला.
साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या जातीची आणि विचारांची माणसे उभा करणं हेच खरे चिरंतर, शाश्वत स्मारक ठरेल या विश्वासाने या वयात-आजारपणात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात समाजाच्या वेदना-संवेदना जाणून घेण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधात समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा एक योद्धा म्हणून त्यांचा नावलौकिक सदैव राहील.
खरा इतिहास आणि दिशादर्शक भविष्य यांच्यावरची दूरदृष्टी कायम राखत वर्तमानात जगणारे अनुभवी राजकीय व्यक्तीमत्व म्हणून मा. मधुकरराव कांबळे यांच्याकडे निश्चितच पाहिलं जाईल. असंबद्ध माहितीचा भडीमार होत असलेल्या जगात ‘स्पष्टता’ हीच शक्ती असते आणि स्पष्ट जगणारा, स्पष्टपणे विचार मांडणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मा. मधुकरराव कांबळे यांचा जीवन प्रवास आहे. वास्तव अनेक धाग्यांनी विणले गेलेलं असते. मातंग समाजाच्या अस्मितेचा एक प्रमुख धागा म्हणून मा.ना.मधुकरराव कांबळे यांचं सामाजिक आयुष्य अधोरेखित आहे. मानवी स्वातंत्र्य आणि समता-न्याय यांचे पाठराखण करणारा जागतिक समुदाय असेल तर त्या समुदायांमध्ये मा.ना. मधुकरराव कांबळे यांचे नाव अग्रहक्काने असेल. असा, शोषित वंचित उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेऊन निधड्या छातीने, सामाजिक न्याय आणि समता यासाठी आक्रोश करणारा “समाज नायक” ; सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांत सदा राहो. ही दुःखी मनाची कामना.
(श्रद्धांजली’ चा विषयच नाही)

– कुलदीप देवकुळे
माजी जनसंपर्क अधिकारी,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासन मुंबई

 

 

 

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.