प्रतिष्ठा न्यूज

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करुन अहवाल सादर करावा शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
नाशिक, दि. 10 : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराणे, तर सटाणा, शेमळी, अजमोर – सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापूर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी 8 एप्रिल,2023 रोजी बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाणचे प्रांत बबन काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डाळिंब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.